काका काय झाले? असे विचारून लुटणारे चौघे अटकेत

By Admin | Published: June 22, 2016 08:50 PM2016-06-22T20:50:00+5:302016-06-22T21:08:54+5:30

खिशातील मोबाईल आणि रोख २१ हजार रुपये लुटणाऱ्या चार जणांना क्रांतीचौक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

What happened uncle Four lynching suspects | काका काय झाले? असे विचारून लुटणारे चौघे अटकेत

काका काय झाले? असे विचारून लुटणारे चौघे अटकेत

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 22 - अशक्तपणामुळे चक्कर येऊन पडलेल्या सैनिकाला काका काय झाले, असे विचारत त्यांच्या खिशातील मोबाईल आणि रोख २१ हजार रुपये लुटणाऱ्या चार जणांना क्रांतीचौक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. देणी फेडण्यासाठी आणि मोटारसायकल खरेदी करण्यासाठी ही लूट केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

विनोद साळुंके (रा.शिवाजीनगर), तस्लीम खान, शेख आवेस आणि अमोल पवार (रा. गरमपाणी) अशी आरोपींची नावे आहेत. लष्कराच्या नाशिक येथील कार्यालयात भाऊसाहेब दौलत आग्रे (रा. डोंगरगाव, ता. कन्नड) हवालदार आहेत. १३ जून रोजी न्यायालयीन कामकाजासाठी ते औरंगाबादेत आले होते. त्यानंतर दुपारी ते जेवणासाठी एका हॉटेलमध्ये गेले. तेथील जेवण त्यांना व्यवस्थित न वाटल्याने ते हॉटेलबाहेर पडले. सकाळपासून जेवण न झाल्याने त्यांना प्रचंड अशक्तपणा आल्याने ते चक्कर येऊन पडले. त्याच वेळी आरोपी हे तेथून जात होते. त्यांनी आग्रे यांना रस्त्यावर अर्धवट बेशुद्धावस्थेत पडल्याचे पाहिले. ते चारही जण त्यांच्याजवळ गेले. काका तुम्हाला काय झाले आहे? असे म्हणत त्यांना सरळ केले. त्यावेळी त्यांच्या खिशातील मोबाईल खाली पडला. हा मोबाईल उचलल्यानंतर अन्य आरोपींनी त्यांचे खिसे चाचपडायला सुरुवात केली. यावेळी आग्रे यांच्या खिशातील रोख २१ हजार रुपये आरोपींनी काढून घेतले. आग्रे यांनी त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा प्रतिकार कमी पडला. याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता.

आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद


आरोपींनी एका हॉटेलजवळच आग्रे यांना लुटल्याचे समजल्याने पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील एका हॉटेलवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज मिळविले. या फुटेजमध्ये चारही आरोपी आग्रे यांना लुटत असल्याचे स्पष्ट दिसले. विशेष म्हणजे आरोपींविरोधात यापूर्वी एकही गुन्हा दाखल नाही. त्यामुळे ते पोलिसांच्या रेकॉर्डवरील नव्हते. असे असताना पोलीस उपनिरीक्षक संजय बनकर, सहायक फौजदार रहीम, दीपक भवर, राजेश चव्हाण, विनोद नितनवरे, विशाल पाटील, गणेश वाघ, सतीश वाघ, संतोष रेड्डी यांनी आरोपींना पकडून आणले.

कर्ज फेडण्यासाठी केली लूट

आरोपी विनोद साळुंके याने अन्य आरोपींच्या मध्यस्थीने एक जणाकडून कर्ज घेतले होते. या कर्जाची वेळेत परतफेड न झाल्याने तो सावकार त्यास शिवीगाळ करीत पैशाची मागणी करीत होता. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने ही लूट केल्याचे पोलिसांना सांगितले.

Web Title: What happened uncle Four lynching suspects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.