महाराष्ट्रातील भाजपला काय झालंय?: धनंजय मुंडे यांचा सवाल
By Admin | Published: April 5, 2017 02:20 PM2017-04-05T14:20:32+5:302017-04-05T14:20:32+5:30
उत्तर प्रदेशात शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर, महाराष्ट्रातील विरोधीपक्ष आक्रमक झाला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 : उत्तर प्रदेशात शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर, महाराष्ट्रातील विरोधीपक्ष आक्रमक झाला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. उत्तर प्रदेशात भाजपप्रणित योगी आदित्यनाथ यांचं सरकार आहे. महाराष्ट्रातही भाजपचंच सरकार आहे. मग एकाच पक्षाची दोन राज्यात वेगवेगळी विचारधारा कशी असू शकते? महाराष्ट्रातल्या भाजपला काय झालंय? असे सवाल, धनंजय मुंडे यांनी उपस्थित केले.
कर्जमाफी तर सोडाच पण गेल्या अडीच वर्षात या सरकारने शेतकऱ्यांचं वाटोळं केलं. आज नऊ हजार आत्महत्या झाल्या, उद्या पंचवीस हजार आत्महत्या व्हायची सरकार वाट पाहतंय का? या अधिवेशनाच्या काळात 100 शेतकाऱ्यांनी आत्महत्या केल्या याची लाज वाटली पाहिजे, असा हल्लाबोल मुंडेंनी केला.
स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून येताय म्हणून मस्ती आलीय? सगळं आलबेल सुरु आहे, असं वाटतंय? तर तसं नाही. शेतकरी रोज मरतोय. आज रस्त्यावर उतरलो, संघर्ष यात्रा काढली तर का काढली असं विचारताय. यांचं पेटंट घेतलं अशी यांची भावना झाली. जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटू द्या. आमची एसी गाडी दिसली मात्र तुमच्या यात्रेत कोण कुठल्या गाडीत आणि पंच तारांकित हॉटेलमध्ये राहायचं हे मलाही सांगता येईल, अशी आक्रमक भूमिका मुंडेंनी मांडली.