पोलीस FIR नोंदवत नसतील तर काय कराल ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2017 07:27 PM2017-08-07T19:27:42+5:302017-08-07T19:30:57+5:30
गुन्हा घडल्यानंतर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करायला गेल्यानंतर काहीवेळा काहीजणांना विचित्र अनुभव येतो.
मुंबई, दि. 7 - गुन्हा घडल्यानंतर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करायला गेल्यानंतर काहीवेळा काहीजणांना विचित्र अनुभव येतो. पोलीस सहकार्य करण्याऐवजी मानसिक खच्चीकरण करत असल्याचा अनुभव येतो.
पोलीस अधिका-याने एफआयआर नोंदवण्यास नकार दिला तर अशावेळी काय कराल ?
गुन्हा घडल्यानंतर तुम्ही एफआयआर दाखल करण्यास पोलीस स्थानकात गेलात आणि संबंधित पोलीस कर्मचा-याने अनावश्यक कारणे देऊन तुमचा एफआयआर नोंदवण्यास नकार दिला तर, अशावेळी तुम्ही वरिष्ठ पोलीस अधिका-याची भेट घ्या. त्यानंतरही गुन्हा नोंदवला गेला नाही तर, तुम्ही जवळच्या मॅजिस्ट्रेटकडे लिखित तक्रार करु शकता. मॅजिस्ट्रेट त्यानंतर पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे आदेश देईल. एफआयआरची नोंद झाल्यानंतर रिसिप्ट घ्यायला विसरु नका.
एखादी छोटी-मोठी घटना असेल किंवा हद्दीच्या मुद्यावरुन पोलीस अधिकारी एफआयआर नोंदवायला नकार देऊ शकतो. सध्याच्या कायद्यानुसार गुन्हा हा दोन प्रकारात मोडतो. एक दखलपात्र आणि दुसरा अदाखलपात्र. दखलपात्र गुन्ह्यात एफआयआर दाखल होतो. अदखालपात्र गुन्ह्यात मॅजिस्ट्रेट पोलिसांना कारवाईचे आदेश देतो.
हत्या, बलात्कार, दंगल, दरोडा हे दखलपात्र गुन्हे आहेत. या गुन्ह्यांमध्ये पोलीस वॉरंट शिवाय आरोपीला अटक करु शकतात. फसवणूक, घोटाळा, सार्वजनिक उपद्रव हे अदाखलपात्र गुन्हे असून यामध्ये पोलीस वॉरंटशिवाय अटक करु शकत नाहीत.