बाबूरावांचा सवाल, आपल्या घराला किल्ल्याचे नाव दिले तर?
By अतुल कुलकर्णी | Published: January 16, 2022 08:09 AM2022-01-16T08:09:29+5:302022-01-16T08:09:47+5:30
मंत्र्यांच्या बंगल्यांना किल्ल्यांची नावे देण्याचा निर्णय झाल्याची बातमी बाबूरावांनी वाचली आणि तत्काळ सौं.ना आवाज दिला, ‘अहो, ऐकलं का...? मी काय म्हणतोय, आपण आपल्याही घराला एखाद्या किल्ल्याचं नाव द्यायचं का..?’
- अतुल कुलकर्णी
मंत्र्यांच्या बंगल्यांना किल्ल्यांची नावे देण्याचा निर्णय झाल्याची बातमी बाबूरावांनी वाचली आणि तत्काळ सौं.ना आवाज दिला, ‘अहो, ऐकलं का...? मी काय म्हणतोय, आपण आपल्याही घराला एखाद्या किल्ल्याचं नाव द्यायचं का..?’ तेव्हा किचनमधून आवाज आला... ‘हे काय नवीन खूळ काढलंय सकाळी सकाळी...! तुमच्याच पूज्य पिताजींचं नाव घराला असताना कशाला पाहिजे किल्ल्याचं नाव? छत्रपती शिवाजी महाराजांनी लढून, दिवसरात्र एक करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली... त्यासाठी किल्ले मिळवले. तुम्ही या घरासाठी कर्ज घेतलंय. त्याचे हप्ते भरायचे म्हणून मला साडीसुद्धा आणत नाही कधी... मोठे आले घराला किल्ल्याचं नाव देणारे...! चूपचाप चहा प्या आणि कप द्या धुवायला...
सौं.चा चढलेला पारा पाहून मनातल्या मनात बाबूरावांनी ठरवून टाकले की, या महिन्यात घराचा हप्ता नाही भरला तरी चालेल; पण हिला एक कांजीवरम आणूनच देऊ... तिचीदेखील हौस भागली पाहिजे... असा विचार करीत बाबूरावांनी वर्तमानपत्रातली तीच बातमी पुन्हा वाचायला घेतली.
त्यांचं मन स्वत:च्या घराची आणि मंत्र्यांच्या बंगल्यांची तुलना करू लागलं... आपलं घर बँकेकडे तारण आहे... मंत्र्यांचा बंगला सरकारच्या मालकीचा आहे..! आपल्या डोक्यावर भलंमोठं कर्ज आहे... सरकारच्या डोक्यावरही आपल्यापेक्षा कितीतरी पट जास्त कर्ज आहे..! आपण हप्ते भरून भरून थकतो... सरकारही हप्ते भरून भरून थकत असेल; पण ते दाखवत नाही..! आपल्याला हप्ता चुकला की दुसऱ्या महिन्यात पगारही पुरत नाही... सरकारचे हप्ते थकले की ते लोकांचे दोन-दोन महिने पगारच देत नाही..! (परवाच नाही का ते एस.टी.वाले संपकरी सांगत होते, आम्हाला दोन-दोन महिने पगार मिळत नाही म्हणून...)
जर का एवढं साम्य असेल तर जे सरकारला जमू शकतं ते आपल्या घरच्या ‘सरकार’ना का पटत नाही?
हिंमत करून बाबूरावांनी पुन्हा एकदा सौं.ना आवाज दिलाच. ‘अहो मंडळी, मी काय म्हणतोय... आपल्याला फक्त नाव तर द्यायचंय... सरकारनं दिलं तसं... तुम्हाला काय हरकत आहे... आपणही आपल्या घराला देऊन टाकू एखाद्या किल्ल्याचं नाव. त्यात काय एवढं...?’ ते ऐकताच गॅस बंद करून एका हातात लाटणं घेऊन, कमरेवर हात ठेवत सौ. हॉलमध्ये आल्या. ‘अहो, जनाची नाही तर नाही, निदान मनाची तरी बाळगा... महाराजांनी मेहनतीने मिळवलेले गडकिल्ले, कधी गेलात का स्वत:च्या पोराला दाखवायला...? कधी सांगितला त्यांचा इतिहास समजावून त्याला...? तुम्ही तरी एखाद्या किल्ल्याचा अभ्यास केला कधी...? मोठे आले बोलायला... तुम्ही काय आणि तुमचं सरकार काय... आकंठ कर्जात बुडालेलं... तुम्ही घरात नको ते रंगीतसंगीत पाणी पिता, अभक्ष्य भक्षण करता... घराला किल्ल्याचे नाव दिल्यावर त्याचं पावित्र्य कोणी राखायचं? तुमच्याने ते होणार आहे का..? सूर्य मावळला की तुमचे हात थरथरतात... असे म्हणत सौ. एक किलिंग कटाक्ष टाकून किचनमध्ये गेल्या...
‘किल्ल्यांचं पावित्र्य जपता येणार आहे का तुम्हाला...?’ हा सवाल बाबूरावांना अस्वस्थ करू लागला. त्यांनी पुन्हा मंत्र्यांचे बंगले, त्यात राहणारे
मंत्री, त्यांचे गुण-अवगुण आणि पावित्र्य यांची मनातल्या मनात तुलना करणं सुरू केलं...