...त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ! मविआचा महामोर्चा कशासाठी? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 03:35 PM2022-12-17T15:35:51+5:302022-12-17T15:39:58+5:30
"मला काही लोकांनी विचारले, तुम्ही चालणार का? मी म्हणालो, मी एकटा नाही, माझ्यासोबत लाखो महाराष्ट्र प्रेमी नुसतेच नाही, महाराष्ट्र द्रोह्यांच्या छाताडावर चालणार आहेत. आजपर्यंत आपल्याला ज्यांनी ज्यांनी डिवचलं त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ आहे."
बऱ्याच वर्षांनंतर देशाने एवढा मोठा मोर्चा पाहिला असेल. ज्यावेळी मोर्चाची घोषणा केली, तेव्हा मला काही लोकांनी विचारले, तुम्ही चालणार का? मी म्हणालो, मी एकटा नाही, माझ्यासोबत लाखो महाराष्ट्र प्रेमी नुसतेच नाही, महाराष्ट्र द्रोह्यांच्या छाताडावर चालणार आहेत. आजपर्यंत आपल्याला ज्यांनी ज्यांनी डिवचलं त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्रचंड संघर्ष करावा लागला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला, पण अद्यापही बेळगाव, कारवार आदिंसह संयुक्त महाराष्ट्र झालेला नाही. तो घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. हे सांगण्यासाठी आजचा मोर्चा आहे. असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ते आज मुंबईत महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या महामोर्चात बोलत होते.
ठाकरे म्हणाले, "कुणीही यायचं आणि डिवचून जायचं? आज सर्वपक्षाचे झेंडे. सर्वपक्ष एकवटलेत. ही ताकद महाराष्ट्राची आहे. फक्त महाराष्ट्र द्रोहीच या मोर्चात नाहीत आणि बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे तोतये. त्यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत. त्यांचे (बाळासाहेबांचे विचार) विचार नाहीत ते. त्यांचे विचार खुर्चीसाठी दिल्लीशी लाचारी करणारे त्यांचे विचार नव्हते. खुर्ची गेली तरी बेहत्तर, पण महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अस्मितेशी आम्ही तडजोड करणार नाही. होऊ देणार नाही आणि असे जो कुणी करण्याचा प्रयत्न करेल, त्याला गुडघ्यावर खाली झुकवल्याशिवाय राहणार नाही. ही शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना."
"मी त्यांना (राज्यपालांना) राज्यपाल मानत नाही, त्या पदावर कोणीही बसावे आणि कुणालाही टपल्यात मारावे हे आम्ही सहन करणार नाही. शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलतायत, सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलतायत, ज्योतिराव फुलेंबद्दल बोलतायत. जर सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले झाले नसते तर आपण कुठे असतो, त्याचे उदाहरण आपल्या मंत्र्याने भीक हा शब्द वापरून दाखविले आहे. हे वैचारिक दारिद्र्य आहे," अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
"आपल्या मुंबईचे पालकमंत्री, त्यांनी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेची बरोबरी या खोके घेऊन पसार झालेल्यांसोबत केली. हे आपल्या राजकीय पक्षाच्या, स्वत:च्या आईच्या छातीत वार करून पसार झाले, त्यांची तुलना तुम्ही शिवरायांशी करताय," अशी टीकाही ठाकरे यांनी यावेळी केली.