तिकडे शरद पवारांचे काय चाललेय? शिंदेंच्या भेटीला आव्हाड, फडणवीसांच्या भेटीला खासदाराला पाठविले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 03:06 PM2024-12-02T15:06:05+5:302024-12-02T15:07:03+5:30
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी शिवसेनेच्या आमदारांची ये-जा सुरु आहे. तर तिकडे फडणवीसांच्या सागर निवासस्थानी भाजपाच्या नेत्यांची रेलचेल सुरु आहे.
महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण, नवा गृहमंत्री कोण यावरून महायुतीत नाराजी नाट्य सुरु असताना दुसरीकडे शरद पवार राजकीय वर्तुळाला चकीत करून सोडत आहेत. शिंदेंनी दोन दिवसांपूर्वी सर्व बैठका रद्द करून गावी जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा शरद पवारांनी त्यांचे विश्वासू आमदार जितेंद्र आव्हाड यांना शिंदेंच्या भेटीला पाठविले होते. आता पुन्हा शिंदेंनी बैठका रद्द केलेल्या असताना पवारांनी आपल्या खासदाराला फडणवीसांच्या भेटीला पाठविल्याने चर्चांना उधाण आले आहे.
शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी शिवसेनेच्या आमदारांची ये-जा सुरु आहे. तर तिकडे फडणवीसांच्या सागर निवासस्थानी भाजपाच्या नेत्यांची रेलचेल सुरु आहे. यातच अचानक शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे भिवंडीते खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. पवारांचा खासदार अचानक फडणवीसांच्या भेटीला कशासाठी आला, असा सवाल भाजपच्या नेत्यांच्याही मनात चुकचुकला होता.
यावर बाळ्या मामा यांनी फणवीसांची भेट ही सदिच्छा भेट असल्याचे म्हटले आहे. दोनच दिवसांपूर्वी आव्हाडांनी शिंदे साताऱ्याला जायला निघण्यापूर्वी शिंदेंची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. याचे कारण काहीच सांगण्यात आले नव्हते. महायुतीच्या तीन तिघाडाच्या स्पर्धेत शरद पवार मध्येच गुगली टाकत असल्याने नेमके शरद पवारांचे काय चाललेय, यावरही चर्चा सुरु झाल्या आहेत.
राज्यात महायुतीचे जुळत नसताना नवीनच समीकरण जुळविण्याचा तर प्रयत्न होत नाहीय ना असा सवालही राजकारण्यांच्या मनात घोळू लागला आहे. अद्याप सरकार बनलेले नाही, त्यात शरद पवारांचे आमदार, खासदार महायुतीच्या नेत्यांची भेट का घेत आहेत, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होऊ लागला आहे.