Gautami Patil Real Name: फक्त आडनावच नाही तर गौतमीच्या नावातही आहे घोळ; खरं नाव आलं समोर, वडील म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 03:15 PM2023-06-02T15:15:42+5:302023-06-02T15:16:50+5:30
Gautami Patil Real Name: शाळेच्या दाखल्यावर गौतमी असे नाव आहे. मात्र, तिचे खरे नाव वेगळे आहे, असे तिच्या वडिलांनी सांगितले.
Gautami Patil Real Name: सबसे कातील... गौतमी पाटील... हे वाक्य आज अनेकांच्या ओठी ऐकायला मिळते. राज्यातील एकही असा जिल्हा नसेल जिथे गौतमीचा कार्यक्रम होत नसेल. अगदी लग्न समारंभ, वाढदिवसानिमित्तही गौतमीला बोलावले जाते. गौतमीच्या डान्सला, तिच्या कार्यक्रमांना विरोध होत असला तरी तिचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तिच्याविषयी छोट्यातली छोटी गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. यातच आता गौतमीचे वडील कोण आहेत, याबाबत माहिती मिळाली आहे. गौतमी पाटील हिच्या वडिलांनी गौतमीच्या नावाबाबत मोठा खुलासा केला आहे.
काही दिवसांपूर्वी गौतमी पाटील हिच्या आडनावावरून वाद निर्माण झाला होता. मी पाटीलच आहे आणि हे नाव मी वापरणारच माझ्याबद्दल कोणी काहीही बोलले तरी, मला काही फरत पडत नाही. मी जे कार्यक्रम करते ते, सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. माझे हे कार्यक्रम चांगले पार पडत आले आहेत, अशी रोखठोक प्रतिक्रिया गौतमी पाटील हिने दिली होती. यानंतर आता गौतमी पाटील हिच्या वडिलांनी तिच्या खऱ्या नावाबाबत माहिती दिली आहे.
शाळेतील दाखल्यावर गौतमी पाटील आहे, पण तिचे खरे नाव...
गौतमी पाटीलचे वडील रवींद्र नेरपगारे यांनी गौतमीच्या नावाबाबत महत्त्वाची माहिती दिली. गौतमीच्या वडिलांनी तिच्या नावाबाबत बोलताना सांगितले की, गौतमीचे शाळेतील दाखल्यावरील नाव गौतमी पाटील आहे आणि जन्म नाव वैष्णवी आहे. मी २० वर्षांपासून गौतमी आणि तिच्या आईपासून वेगळा राहतो, असे ते म्हणाले. गौतमीने पाटील आडनाव लावू नये, असे सांगितले जात आहे. यावर बोलताना, जर तिचे आडनाव पाटील आहे तर ती पाटील आडनाव हे लावणारच. मला अनेकवेळा गौतमीची आठवण येते. पण तिच्याबरोबर कधी संपर्क झाला नाही. गौतमी पाटील करत असलेल्या नृत्याबाबत आनंद वाटतो. मात्र काही जण तिच्यावर ज्या टीका करतात, त्याच वाईट वाटते, असे गौतमीचे वडील म्हणाले.
दरम्यान, वडिलांना भेटायला जाणार का, असा प्रश्न गौतमी पाटीलला विचारण्यात आला होता. यावर, मी इथपर्यंत कशी आली आहे, हे मी तुम्हाला सांगितले होते. हा कौटुंबिक प्रश्न आहे त्यामुळे मी काही बोलू शकत नाही. मी एकट्याने निर्णय घेऊ शकत नाही. माझ्या मागे माझी आई आहे. मी यावर बोलू शकत नाही. कौटुंबिक वाद असल्याने तो इथे आणू इच्छित नाही, असे गौतमी पाटीलने स्पष्टपणे सांगितले.