उदय सामंतांचं 'ते' विधान अन् निलेश राणेंची राजकारणातून अचानक एक्झिट; नेमका काय संबंध?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 01:41 PM2023-10-24T13:41:18+5:302023-10-24T13:42:41+5:30
सोमवारीच मंत्री उदय सामंत हे कोकण दौऱ्यावर असताना त्यांनी केलेले विधान चर्चेत आले.
मुंबई – दसऱ्यानिमित्त राज्यभरात होणाऱ्या राजकीय मेळाव्यांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत. त्यातच सकाळी अचानक केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या एका ट्विटनं भाजपाला धक्का बसला आहे. निलेश राणे यांनी सक्रीय राजकारणातून कायमचे बाजूला जात असल्याचे घोषित केले. निलेश राणेंनी हा पवित्रा का आणि कशासाठी घेतला हे अद्याप स्पष्ट नसले तरी रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या राजकारणात याची चर्चा होताना दिसतेय.
सोमवारीच मंत्री उदय सामंत हे कोकण दौऱ्यावर असताना त्यांनी केलेले विधान चर्चेत आले. उदय सामंत म्हणाले होते की, आपल्याच तालुक्यात, जिल्ह्यात नाही तर पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात किरण सामंत यांचे वातावरण आहे. मध्ये मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेलो होतो तेव्हा तिथल्या लोकांनी मला सांगितलं, किरण सामंत यांच्याऐवजी दुसरा कुणी उमेदवार दिला तर विजयाची शक्यता तुम्ही बाळगू नका असं सांगितलं. ही माणसं आपल्या पक्षातील नव्हते. आपल्या पक्षातील लोकांनी आपल्या नेत्यासाठी तिकीट मागणं समजू शकतो पण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील लोकांनीही म्हटलं ज्यावेळी भैय्यासाहेबांची उमेदवारी जाहीर होईल. तेव्हा हजारो लोकं पक्ष बाजूला ठेऊन त्यांच्या पाठीशी उभं राहू असं त्यांनी म्हटल होते.
कोण आहे किरण सामंत?
किरण सामंत हे मंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू आहेत. उद्योजक किरण सामंत अनेक वर्षे राजकारणात कार्यरत आहेत. मात्र ते नेहमी पडद्यामागे होते. राज्यात शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून ते पडद्यासमोर येऊन कार्यरत झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार म्हणून किरण सामंत यांचे नाव चर्चेत आहे. सरकारने किरण सामंत यांची सिंधुरत्न योजनेच्या सदस्यपदी नेमणूक केली. रत्नागिरी मतदारसंघात उदय सामंत चार वेळा निवडून आलेत त्यामागे किरण सामंत यांचाही मोठा वाटा आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या राजकारणात ते सक्रीय आहेत. किरण सामंत यांनी आजपर्यंत त्यांनी कुठलेही राजकीय पद घेतले नव्हते ते राजकारणात फ्रंटला नसले तरी पडद्यामागून सूत्रे त्यांच्या हातात असतात. मतदारसंघात दांडगा जनसंपर्क, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, अडलेल्या लोकांची कामे करणे यातून ते सतत कार्यरत असतात. रत्नागिरी-सिंधुदुर्ग इथं त्यांचा चांगला जनसंपर्क आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपा यांनी राज्यात मिशन ४५ हाती घेतले आहे. त्यात निवडून येणाऱ्या उमेदवारालाच तिकीट देण्याचा महायुतीचा इरादा आहे. त्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग इथं सध्या विनायक राऊत खासदार आहेत. ते ठाकरे गटात आहेत. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात विजयी होण्यासाठी शिंदेची शिवसेना-भाजपा प्रयत्नशील आहेत. त्यात उदय सामंत यांच्या बंधूचे नाव सातत्याने चर्चेत आहे. अशावेळी निलेश राणेंनी अचानक राजकारणातून एक्झिट घेतल्याने किरण सामंत यांचा मार्ग मोकळा झाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.