'मातोश्री'चे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांचं शिक्षण आणि संपत्ती किती?; प्रतिज्ञापत्रातून उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 12:38 PM2024-07-03T12:38:56+5:302024-07-03T12:40:50+5:30
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे विश्वासू असून विधान परिषदेच्या निवडणुकीत ठाकरे गटाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मुंबई - विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यात ११ जागांसाठी १२ जणांचे अर्ज आलेत. यात महाविकास आघाडीकडे मते नसतानाही तिसरा उमेदवार रिंगणात उतरवण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांचे स्वीय सहाय्यक असलेले पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. नार्वेकरांच्या उमेदवारीनं विधान परिषदेच्या निवडणुकीची चूरस वाढली आहे.
मिलिंद नार्वेकर पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले आहेत. मंगळवारी विधान भवनात नार्वेकरांनी उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र जोडले आहे. या प्रतिज्ञापत्रातून नार्वेकरांनी त्यांची संपत्ती सार्वजनिक केली आहे. मिलिंद नार्वेकर हे दहावी पास आहेत. मात्र त्यांच्याकडे कोट्यवधीची संपत्ती आहे. त्यात स्थावर मालमत्तेची किंमत एकूण ४ कोटी १७ लाख ६३ हजार इतकी आहे तर त्यांच्या पत्नी मीरा नार्वेकर यांच्याकडे ११ कोटी ७४ लाखांची स्थावर मालमत्ता आहे. नार्वेकरांकडे रत्नागिरीतील मुरुड येथे आणि बनवेवाडी मोराले, बीड येथे शेत जमीन आहे.
बँक अकाऊंटमध्ये ठेवी
मिलिंद नार्वेकरांच्या स्वत:च्या नावे - ७४ लाख १३ हजार २४३ रुपये
पत्नी मीरा नार्वेकर यांच्या नावे - ८ कोटी २२ लाख १६ हजार ११८ रुपये
वैयक्तिक कर्जाची रक्कम
मिलिंद नार्वेकर - २६ लाख ३८ हजार १६० रुपये
पत्नी मीरा नार्वेकर - ३ कोटी २२ लाख ४५ हजार रुपये
जवळपास ७१ लाख २८ हजारांचे दागिने मिलिंद नार्वेकरांच्या नावे तर पत्नी मीरा नार्वेकरांच्या नावे ६७ लाख ६१ हजारांचे दागिने आहेत. या दागिन्यात सोने, चांदी आणि डायमंडचा समावेश आहे. तर बँक आणि अन्य संस्थेकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम मिलिंद नार्वेकरांवर १ कोटी ५४ लाख ८१ हजार ९८९ रुपये तर पत्नीच्या नावावर ३८ लाख ९४ हजार ८०७ रुपये कर्ज आहे. नार्वेकर कुटुंबाकडे कुठलेही वाहन नाही. मालाड, पवई इथे फ्लॅट, पत्नीच्या नावे अलिबागमध्ये फार्म हाऊस आहे.मिलिंद नार्वेकरांच्या उत्पन्नाचं स्त्रोत हे पगार, घरातून मिळणारे भाडे, उद्योगातील नफा हे आहे.