छत्रपतींचा पुतळा पडल्यानंतर सामान्य मालवणकरांची भावना काय?; राजकारण्यांनो ऐकाच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 03:58 PM2024-08-30T15:58:43+5:302024-08-30T15:59:35+5:30
राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर विविध पक्षांचे नेते त्याठिकाणी भेट देत आहेत. त्यावरून मालवणकरांच्या मनात नेमकं काय हे समोर आले आहे.
मालवण - राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर राज्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही माफी मागितली तर विरोधी महाविकास आघाडीने या प्रकरणावरून महायुती सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले. इतकेच नाही तर राजकोट किल्ल्यावर अनेक नेते भेटी देत आहेत त्यात राजकीय कार्यकर्ते एकमेकांवर तुटून पडलेत. या सर्व घटनांमध्ये सामान्य मालवणकरांना नेमकं काय वाटतं ते आता समोर आलं आहे.
यावेळी एका स्थानिक रिक्षाचालकाने सांगितले की, हा पुतळा पडलाय त्यावर राजकारण करू नये. सोसाट्याच्या वाऱ्यात समुद्रकिनारी असलेला हा पुतळा पडला. राजकीय पक्षांनी आपसात भांडून काय होणार? नवीन पुतळा चांगल्या प्रकारे बांधा असं त्यांनी म्हटलं. त्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर राजकारण्यांनी अती केले आहे. घटना बाजूला राहिली पण राजकारण जास्त झालं. हा पुतळा नव्याने पुन्हा उभारावा, ८ महिन्यात हा पुतळा पडणं हे आमच्यासाठी लज्जास्पद आहे. त्यामुळे आता भक्कम पुतळा उभारावा असं एकाने सांगितले. मालवण शहरातील सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया ABP माझानं त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केल्या.
त्याशिवाय मालवणात हा पुतळा बांधल्यापासून आमचा व्यवसाय खूप वाढला. पर्यटकांची संख्या वाढली. हा पुतळा पुन्हा बांधला जावा. आम्हाला सगळे पक्ष सारखे, राजकारण आम्हाला जमत नाही असं एका हॉटेल व्यावसायिक महिलेने सांगितले तर पुतळा उभारला ते चांगले झाले पण पंतप्रधान येऊन, इतका कोट्यवधी खर्च करून ८ महिन्यात पुतळा पडावा हे कोकणवासियांचे दुर्दैव आहे. राजकारणी सगळे लबाड, हे राजकारण करतायेत. कोट्यवधी रुपये खर्च करून तुम्ही बोगसगिरी करतायेत. छत्रपती शिवाजी महाराज हे सामान्य नव्हते. पक्ष विसरा, जी घटना घडली ही फार दुर्दैवी घडली. आता नव्याने पुतळा उभारताना वादळ, वारा या वातवरणाचा अभ्यास करून भरीव करावा. थातूरमातून करून पुतळा उभारणार आणि पुन्हा असा अपमान होण्यापेक्षा तो नसलेला बरा असं हॉटेलमधील वृद्ध ग्राहकाने सांगितले.
दरम्यान, हा पुतळा आम्ही पाहिला होता. बांधकाम बघितले होते ते काही चांगल्या गुणवत्तेचं नव्हते हाच महाराजांचा अपमान आहे. मात्र हा पुतळा का पडला, त्यामागची कारणे काय हे बाजूला पडलं आणि त्यात राजकारण सुरू झालं. चांगल्या दर्जाचा पुतळा का बनवला नाही. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. हे राजकारण करून त्यात सामान्य नागरिकांचा काही फायदा नाही. मालवणात आमच्या इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे आमच्यासाठी वेदनादायी आहे. पुतळा बनवताना कुठलेही निकष पाळले नाहीत हे कळल्यावर दु:ख झालं असं एका शिक्षकाने भावना व्यक्त केली.