सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेसाठी आनंदाची गोष्ट कोणती? संजय राऊतांनी एका वाक्यात सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 03:10 PM2023-05-11T15:10:32+5:302023-05-11T15:13:41+5:30
"सर्वोच्च न्यायालयाचे सर्व घडामोडींवर लक्ष आहे. विधानसभेचे अधक्ष्य या डॉ. आंबेडकरांच्या महाराष्ट्रात संविधानाची हत्या करू शकत नाहीत."
संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर साधारणपणे 11 महिन्यांनी निर्णय आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालासंदर्भात बोलताना, "सत्ता नसून, शिवसेनेवरचा दावा फेटाळला. ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, असे शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते न्यायालयाच्या निकालानंतर पत्रकारांसोबत बोलत होते.
आमच्यासाठी 'ही' सर्वात आनंदाची गोष्ट -
राऊत म्हणाले, "आमच्यासाठी सर्वाद दिलासादायक गोष्ट म्हणजे, सत्ता नसून, शिवसेनेवरचा दावा फेटाळला. ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. सत्ता येते, सत्ता जाते. पण बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर, कुणीही ऐरा-गैरा, चोर, दरोडे खोर, हा दावा करू शकत नाही. ही आमची भूमिका होती, आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे."
याच बरोबर, "सर्वोच्च न्यायालयाचे सर्व घडामोडींवर लक्ष आहे. विधानसभेचे अधक्ष्य या डॉ. आंबेडकरांच्या महाराष्ट्रात संविधानाची हत्या करू शकत नाहीत. नैतिकतेच्या मुद्द्यावर, मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारने ताबडतोब राजीनामा द्यायला हवा. उगाच टाळ्या वाजत बसू नये, असेही राऊत यावेळी म्हणाले.
'त्या' 16 आमदारांसंदर्भातही केलं भाष्य -
"आता 16 आमदारांचा निकाल विधानसभा अध्यक्षांकडे येणार असेल तर येऊ द्या. जर व्हिपच बेकायदेशी आहे, संपूर्ण प्रक्रियाच बेकायदेशीर आहे, मग विधानसभा अध्यक्षांनी त्या बेकायदेशीर प्रक्रियेवर आपली भूमिका घ्याला हवी. जर घटनेनुसार देश चालणार असेल, लोकशाहीनुसार चालणार असेल तर विधानसभा अध्यक्षांनी आपण संविधानाच्या बाजूने आहोत की, घटनाबाहाय्य बेकायदेशीर लोकांच्या बाजूने आहोत? हे बघायला हवे", असेही राऊत यावेळी बोलताना म्हणाले.