प्राध्यापक होण्यासाठी ३० लाख द्यावे लागतात हे कोणत्या नैतिकतेत बसते?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 05:00 AM2022-04-24T05:00:31+5:302022-04-24T05:00:44+5:30

राजन गवस यांचा सवाल : उदगीरच्या साहित्य संमेलनात रंगली मुलाखत

What is the morality behind paying Rs 30 lakh to become a professor? | प्राध्यापक होण्यासाठी ३० लाख द्यावे लागतात हे कोणत्या नैतिकतेत बसते?

प्राध्यापक होण्यासाठी ३० लाख द्यावे लागतात हे कोणत्या नैतिकतेत बसते?

googlenewsNext

राम शिनगारे
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी 
उदगीर (जि. लातूर) : समाज घडविण्यासाठी शिक्षक महत्त्वाचा असतो. आज शालेय पातळीवर दर्जेदार शिक्षक मिळणे दुरापास्त झाले आहे. महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक होण्यासाठी ३० लाख रुपये द्यावे लागतात. हे कोणत्या नैतिकतेत बसते? असा सवाल करीत संस्थाचालक आणि सरकारने शिक्षणाचा बट्ट्याबोळ केला असल्याचा आरोप ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी केला. उदगीर येथे सुरू असलेल्या ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक राजन गवस यांच्या प्रकट मुलाखतीने झाली. नागपूरचे डॉ. प्रमोद मुनघाटे आणि पुण्यातील विनोद शिरसाट यांनी त्यांना बोलते केले. 

डॉ. गवस म्हणाले, आमच्या कुटुंबात कोणीही शिकलेले नव्हते. वर्ष संपले की, गेला का पुढच्या वर्गात असे विचारले जायचे. गुरं-ढोरं सांभाळत, उनाडक्या, शेतात काबाडकष्ट करीत आमचे बालपणातील शिक्षण झाले. बालपणात लिहिलेली चार ओळींची बेढर नावाची कविता दादा सबनीस यांनी छापली. हाच आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. कवितेने मला जगवले.  यानंतर कथांमधून कृषक समाजाचे चित्रण रेखाटले. हे माझ्या आयुष्याच्या संबंधितच होते. महाविद्यालयीन चळवळीत काम करताना आलेल्या अनुभवातून, वैतागातून चौंडक, भंडारभोग या कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. २५ वर्षांनंतर याच कादंबऱ्यांवर जोगवा  नावाचा चित्रपट निघाला. तणकट, ब-बळीचा या कादंबऱ्या गावातील जातीयता, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर आहेत, असेही गवस यांनी सांगितले.

कृषिजन व नागर लोकांचे आयुष्य भिन्न
ग्रामीण भागातील लोक जेवण करताना पहिला घास इतरांसाठी बाजूला काढून ठेवतात. तेच नागर संस्कृती असलेल्या शहरात होत नाही. शहरात देणारे नव्हे ओरबडणारे असतात. त्यामुळे कृषिजन आणि नागर भद्र लोकांचे आयुष्य भिन्न स्वरूपाचे असल्याचे मत राजन गवस यांनी मांडले.

होय, मी नेमाडपंथी
मुलाखतकारांनी आपण नेमाडे घराण्याचे असल्याचे बोलले जाते, अशी चर्चा नेहमी होते, असा प्रश्न विचारला. त्यावर गवस यांनी होय मी नेमाडपंथी आहे, असे स्पष्ट केले. तसेच ज्यांनी कांदबरी लिहिण्याचे बळ दिले. त्यांच्या नावाने आपल्याला ओळखले जात असेल तर त्यात काय चूक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: What is the morality behind paying Rs 30 lakh to become a professor?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.