फडणवीस-ठाकरे भेटीमागचं 'राज' काय?; टीकेनंतरही संवाद, शिंदे-उद्धव यांना सूचक इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 05:59 IST2025-02-11T05:58:32+5:302025-02-11T05:59:44+5:30
केवळ शिंदेंना सोबत घेऊन मुंबईत उद्धव ठाकरेंचा पराभव करता येणार नाही हे लक्षात आल्याने भाजपने राज ठाकरे यांच्याशी संपर्क कायम ठेवला आहे.

फडणवीस-ठाकरे भेटीमागचं 'राज' काय?; टीकेनंतरही संवाद, शिंदे-उद्धव यांना सूचक इशारा
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी सोमवारी सकाळी ९ वाजता पोहोचून त्यांची भेट घेतली. दोघांमध्ये काही मिनिटे गुप्तगु झाले. चर्चेचा तपशील कळू शकला नाही; पण यानिमित्ताने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही फडणवीस यांनी सूचक इशारा दिल्याचे बोलले जात आहे.
विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांचा मुंबईतील सहा जागांवर फटका बसला होता. माहीम मतदारसंघात शिंदेसेनेचे सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी यासाठी त्यांच्यावर दबाव आणला गेला. कारण, राज ठाकरे यांचे पुत्र अमित हे रिंगणात होते. सरवणकर रिंगणात कायम राहिले आणि दोघेही पराभूत होऊन उद्धवसेनेला यश मिळाले होते. तेव्हापासून एकनाथ शिंदे आणि राज यांच्यात फारसे सख्य नसल्याचे बोलले जात होते. सूत्रांनी सांगितले, केवळ शिंदेंना सोबत घेऊन मुंबईत उद्धव ठाकरेंचा पराभव करता येणार नाही हे लक्षात आल्याने भाजपने राज ठाकरे यांच्याशी संपर्क कायम ठेवला आहे.
३ मुद्द्यांत जाणून घ्या भेटीचे राज...
- राज यांनी अलीकडेच मनसेच्या मेळाव्यात भाजपवर टीका केली होती. विधानसभा निकालाच्या आकडेवारीवरून त्यांनी शंका उपस्थित केल्या. असे असतानाही राज सोबत येऊ शकतात हे या भेटीनिमित्त सूचित करून फडणवीस एकाचवेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना अस्वस्थ करत असल्याचे मानले जाते.
- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीसोबत मनसेचे इंजिन जोडले गेले तर उद्धव ठाकरेंना मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये मोठा धक्का बसू शकतो, असे जाणकार सांगतात.
- राज यांचे पुत्र अमित यांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून भाजपच्या कोट्यातून विधानपरिषदेवर घेतले जाणार असल्याची चर्चाही सुरू झाली आहे.
आजची भेट राजकीय नव्हती. फडणवीस व राज ठाकरे यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत, त्या जिव्हाळ्यातून झालेली भेट आहे. राजकीय अर्थ कोणी काढू नये. - संदीप देशपांडे, मनसे नेते
राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कमध्ये कॅफे उघडला आहे. तिथे लोक चहापानाला येत असतात. हा कॅफे सगळ्यांसाठी खुला आहे. लोकांना चांगला नजारा पाहायला मिळतो.- संजय राऊत, उद्धवसेनेचे नेते, खासदार
आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. ही वैयक्तिक भेट होती. युती वगैरेचा काहीही विषय नव्हता. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज यांनी मला अभिनंदनाचा फोन केला होता, तेव्हा मी त्यांना घरी येईन, असे म्हटले होते. त्यानुसार मी आज गेलो, नाश्ता केला, गप्पा झाल्या एवढेच. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
वैयक्तिक मैत्रीतून झालेली ही भेट आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला अजून वेळ आहे, त्याची चर्चा आतापासून कोणीही करणार नाही. - सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते