बँकांचे हे चालले तरी काय?
By admin | Published: July 9, 2014 12:59 AM2014-07-09T00:59:46+5:302014-07-09T00:59:46+5:30
बदलत्या अर्थव्यवस्थेत पारदर्शकता आणि ग्राहकाभिमुखता या दोन गोष्टींसंदर्भात ‘बॅकिंग’ क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा दावा बँकांकडून मोठ्या
ग्राहकांची नाराजी : वर्षभरात ७६ हजार तर दिवसाला २०८ तक्रारी
नागपूर : बदलत्या अर्थव्यवस्थेत पारदर्शकता आणि ग्राहकाभिमुखता या दोन गोष्टींसंदर्भात ‘बॅकिंग’ क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा दावा बँकांकडून मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु तरीदेखील बँकांसंदर्भात ग्राहक असमाधानी असल्याची बाब समोर आली आहे. बँकाच्या कार्यपद्धतीविरुद्ध ग्राहकांनी थेट भारतीय रिझर्व्ह बँकेकडेच दाद मागितली आहे.
गेल्या वर्षभरात संपूर्ण देशातील बँकांच्या कार्यप्रणालीवर असमाधानी असलेल्या ग्राहकांकडून भारतीय रिझर्व्ह बँकेला ७६ हजारांहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत बँकिंग लोकपालमध्ये बँकांशी संबंधित किती तक्रारी आल्या होत्या यासंदर्भात विचारणा केली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ग्राहक सेवा विभागाच्या मुख्य जनसूचना अधिकारी डी.जी.काळे यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत १५ बँकिंग लोकपाल कार्यालयात एकूण ७६ हजार ६१ तक्रारी प्राप्त झाल्या. जर प्रत्येक दिवसाची आकडेवारी काढली तर रिझर्व्ह बँकेला प्रतिदिवशी सरासरी २०८ तक्रारी प्राप्त होत आहेत.
देशभरातील १९९ बँकांविरुद्ध या तक्रारी करण्यात आल्या आहेत. यात अगदी राष्ट्रीयीकृत बँकांपासून ते ग्रामीण सहकारी बँकांचादेखील समावेश आहे. काही बँकांविरुद्ध अवघी एक तक्रार असून अनेक बँकांविरुद्ध हजारो तक्रारी आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या १९९ बँकांच्या यादीत नामवंत बँकांचीदेखील नावे आहेत.(प्रतिनिधी)