"तुम्ही कसले मंत्री?"; देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यावर संजय राऊतांनी उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 11:16 AM2023-10-21T11:16:08+5:302023-10-21T11:16:58+5:30

आमचा सर्वात मोठा ड्रग्जविरोधात मोर्चा निघाला, सर्व जनता रस्त्यावर आली होती. कारण सर्वांच्या घरात ड्रग्स शिरलंय. गृहमंत्र्यांनी त्यावर बोलावे असं राऊतांनी म्हटलं.

"What kind of minister are you?"; Sanjay Raut target DCM Devendra Fadnavis | "तुम्ही कसले मंत्री?"; देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यावर संजय राऊतांनी उडवली खिल्ली

"तुम्ही कसले मंत्री?"; देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यावर संजय राऊतांनी उडवली खिल्ली

मुंबई – ज्या व्यक्तींनी ललित पाटीलचं पालनपोषण केले आणि मातोश्रीवर घेऊन आले ते नाशिकचे दादा भुसे, अजय बोरस्ते आहेत. त्यावेळी अजय बोरस्ते नाशिकचे शहरप्रमुख होते. हे दोघे आता सत्ताधारी पक्षात आहेत. राज्याचे गृहमंत्री २०२० मध्ये ललित पाटील नाशिकचा महानगरप्रमुख होता असा दावा करत असतील तर १९९१-९२ मध्ये मुंबईत दंगली झाल्या तेव्हा दाऊद इब्राहिम तुमच्या पक्षाचा अध्यक्ष होता आणि छोटा शकील भाजपाचा जनरल सेक्रेटरी होता अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले की, तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहात, माहिती घेऊन बोला. तपास करा. ड्रग्ज माफियांकडून भाजपाला हफ्ता मिळतोय. आमचा सर्वात मोठा ड्रग्जविरोधात मोर्चा निघाला, सर्व जनता रस्त्यावर आली होती. कारण सर्वांच्या घरात ड्रग्स शिरलंय. गृहमंत्र्यांनी त्यावर बोलावे. तुमची जबाबदारी आहे. नाशिकसारखं शहर ड्रग्जमुळे खराब झाले आहे. ललित पाटील गुन्हेगार आहे. त्याच्यावरून राजकारण चाललंय. ललित पाटील प्रकरण नाही. तर गुजरातमधून नाशिकमध्ये ड्रग्ज येतंय त्यावर बोला. तुमचे कसले मंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आहात असा सवाल त्यांनी केला.

त्याचसोबत आझाद मैदानात परंपरेनुसार रामलीला होते, पण फुटीर गटाचे मुख्यमंत्री त्यांनी रामलीला हटवायला सांगितली. रावण वध २ दिवस आधी करा असं त्यांना सांगितले, रामराज्याभिषेक नाही केला तरी चालेल. हे नवीन वाल्मिकी आलेत, नवीन रामायण लिहिलं जातंय. त्यामुळे जनता हे पाहतेय असं सांगत संजय राऊतांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावरून जोरदार निशाणा साधला.

दरम्यान, जो विरोधात बोलेल, प्रश्न विचारेल त्यांना जेलमध्ये टाका, सदनातून बाहेर काढा हे देशात षडयंत्र सुरू आहे. विरोधकांना गनपाँईटवर संपवले जातेय. राहुल गांधी, संजय सिंह, संजय राऊत यांना जेलमध्ये टाकलं. २०२४ पर्यंत अनेक विरोधकांना जेलमध्ये टाकले जाईल. परंतु आमची त्यासाठी तयारी आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं. लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडी बनलीय. स्थानिक पातळीवरील निवडणुकीत तिथले नेते निर्णय घेतील असं संजय राऊतांनी स्पष्ट केले.

Web Title: "What kind of minister are you?"; Sanjay Raut target DCM Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.