‘डीबी’ पथकाने काय ‘दिवे’ लावले ?
By admin | Published: February 8, 2017 12:03 AM2017-02-08T00:03:22+5:302017-02-08T00:03:22+5:30
पोलिस अधीक्षकांकडून कानउघाडणी : आढावा बैठकीत वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता; निष्क्रिय कर्मचाऱ्यांची पथकातून हकालपट्टी
कोल्हापूर : भर शहरात मटक्यासारखे अवैध धंदे उघडकीस येतात, मग पोलिस ठाण्यातील ‘डीबी’ पथकाचे पोलिस काय ‘दिवे’ लावतात?, अशी कानउघाडणी मंगळवारी जिल्हा पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे यांनी केली. जिल्ह्यातील गुन्हेगारीचा वाढलेला आलेख कमी करण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्याच्या ‘डीबी’ (गुन्हेशोध) पथकातील पोलिसांची कार्यक्षमता तपासण्यात येणार आहे. त्यांनी गेल्या सहा महिन्यांत केलेल्या तपासकामाचा अहवाल येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत द्यावा. निष्क्रिय व वशिल्याच्या कर्मचाऱ्यांना काढून तिथे गुणवत्तेच्या आधारावर नव्या होतकरू पोलिसांची ‘डीबी’ पथकात नियुक्ती करावी, असे आदेश तांबडे यांनी दिले.
जिल्ह्यातील गुन्हेगारीबाबत मासिक आढावा बैठक मंगळवारी सकाळी पोलिस अधीक्षकांनी घेतली. या बैठकीस अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, गृह पोलिस उपअधीक्षक सतीश माने यांच्यासह सर्व पोलिस उपअधीक्षक आणि पोलिस निरीक्षक उपस्थित होते. बैठकीत अधीक्षक तांबडे यांनी, वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त करून तपासातील निष्क्रियतेबाबत अनेक पोलिस अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. तसेच कामात सुधारणा करण्याबाबत सूचना दिल्या.
गुन्हेगारांची उकल करण्यात कमी पडणाऱ्या ‘डीबी’ पथकातील पोलिसांची उचलबांगडी करणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी यावेळी दिले. प्रत्येक पोलिस ठाण्यात असलेल्या ‘डीबी’ पथकाची पुनर्रचना करणार आहे. गेली अनेक वर्षे पोलिस ठाण्यात ‘डीबी’ पथकात वशिल्याने जागा अडवून बसलेल्या पोलिसांची कार्यक्षमताही तपासणार आहे. या पथकातील कर्मचाऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांतील तपासाचा अहवाल येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत द्यावा. त्याचा फेरआढावा १६ फेब्रुवारीच्या बैठकीत घेणार आहे. निष्क्रिय कर्मचाऱ्यांना बदलून गुणवत्तेवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वाहतुकीसाठी खास पोलिस
संपूर्ण शहरात वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे.त्यामुळे प्रत्येक पोलिस ठाण्यातील किमान तीन पोलिस कर्मचारी व एक अधिकारी ठाण्याच्या हद्दीतील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नियुक्त करणार आहे. हे अधिकारी फक्त वाहतूक नियंत्रणाचेच काम करतील. याशिवाय शहर वाहतूक विभागही आपले काम बजावेल.
तडीपारबाबत सूचना
जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील गुंडांच्या तडीपारीसाठी पाठविलेले पण सुनावणी न झालेले प्रलंबित प्रस्ताव आहेत. त्यांची तातडीने पूर्तता करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यांचीही १६ फेब्रुवारीच्या फेरआढावा बैठकीत तपासणी करणार असल्याचे अधीक्षक तांबडे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय सुरू असल्याचे उघडकीस येईल त्या ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांना फक्त नोटीसच नव्हे, तर त्यापुढील थेट कारवाईच करणार आहे.
- एम. बी. तांबडे, पोलिस अधीक्षक
नव्या १५० गुन्हेगारांवर ‘वॉच’
प्रत्येक पोलिस ठाण्यातील रेकॉर्डवर नसणाऱ्या नव्या किमान २५ गुन्हेगारांची पार्श्वभूमी आठवड्यात जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील अशा किमान १५० नव्या गुन्हेगारांचे रेकॉर्ड (हिस्ट्री शीट्स) तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
या गुन्हेगारांच्या फिंगर प्रिंट्स, फोटो व गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्यांची सध्याची अवस्था यांची एकत्रित माहिती जमा करण्यात येणार आहे. यांपैकी अनेक गुन्हेगार हे चोरी, घरफोडी, जबरी चोरी अशा मालमत्तेसंदर्भातील गुन्ह्णातील असल्याने त्यांच्यावर पोलिस यंत्रणा ‘वॉच’ ठेवणार आहे.