‘घेऊन जा गे मारबत’, नागपूरची ‘मारबत’ व ‘बडगे’ परंपरा नेमकी काय आहे?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 04:37 PM2018-09-09T16:37:42+5:302018-09-09T16:38:21+5:30
समाजातील अनिष्ठ प्रथांचे उच्चाटन करण्याच्या हेतूने नागपुरात ‘तान्हा पोळ्या’ला ऐतिहासिक ‘काळी’ व ‘पिवळी’ मारबत काढण्यात येते. पिवळ्या मारबतीसोबत काळ्या मारबतीचीही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.
-बालाजी देवर्जनकर, नागपूर
/>
समाजातील अनिष्ठ प्रथांचे उच्चाटन करण्याच्या हेतूने नागपुरात ‘तान्हा पोळ्या’ला ऐतिहासिक ‘काळी’ व ‘पिवळी’ मारबत काढण्यात येते. पिवळ्या मारबतीसोबत काळ्या मारबतीचीही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. श्री देवस्थान पंच कमिटीतर्फे इतवारीतून १८८१ पासून ‘काळी मारबत’ची मिरवणूक काढली जाते. जुलमी इंग्रजांच्या कारवायांचा निषेध करण्यासाठी ‘काळी मारबत’ निघण्याची परंपरा सुरू झाली. तर परकीयांच्या गुलामगिरीचे पाश तुटावेत व देश स्वतंत्र व्हावा या देशभक्ती भावनेने प्रेरित होऊन १८८५ मध्ये जागनाथ बुधवारी परिसरात तेली समाजबांधवांनी ‘पिवळी मारबत’ कमिटीची स्थापना केली. तेव्हापासून पिवळी मारबत निघते.
नागपूरच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रासाठी गौरवाची परंपरा असलेली मारबत आणि बडग्यांची मिरवणूक यंदा सोमवारी, दि. १० सप्टेंबरला निघेल. पारंपरिक काळी व पिवळी मारबत वाढती रोगराई व समाजात बोकाळलेल्या कुप्रथांना ‘आपल्यासोबत घेऊन जा’, असे सांगणारे ‘बडगे’ या मिरवणुकीचे विशेष आकर्षण असतात. पोळ््याच्या सणाने श्रावण महिना संपत असतानाही या मिरवणुकीत नागपूरकरांच्या उत्साहाला उधाण आलेले असते. ‘घेऊन जा गे मारबत’, अशी घोषणा देत कुप्रथा, कुनिती, भ्रष्टाचाराचा नाश होवो, रोगराई दूर सरो, असे साकडे मारबतीला घातले जाते. ही गौरवशाली परंपरा उपराजधानीने अगदी उत्साहाने जोपासली आहे.
बैठक मांडून बसलेली २० फुट उंचीची, संपूर्ण पिवळ्या रंगाची, आकर्षक दागिन्यांची मढलेली ही मारबत बघायला विदर्भच नव्हे तर महाराष्ट्रातून लोक येतात. इतवारी धान्य बाजारातून निघणारी काळी मारबतची परंपराही अशीच गौरवशाली. लाल रंगाची लांबलचक जीभ बाहेर काढलेली, प्रचंड वटारलेले डोळे अशा क्रोधित देवीच्या रुपात असलेली ही मारबत या मिरवणुकीचे विशेष आकर्षण असते. खरे तर पुढील काळात या मारबतीच्या माध्यमातून जनजागृतीवर भर देण्यास सुरुवात झाली. या मिरवणुकीत निघणाऱ्या बडग्यांच्या माध्यमातून आता राजकीय व्यंग, भ्रष्टाचार, देशपातळीवरील गुन्हेगारी, सामाजिक गमतीजमती हे विषय विशेष आकर्षण असतात. विषयांची मांडणी योग्यतऱ्हेने व्हावी यासाठी महिनाभरापासून ही मंडळे जीवाचे रान करतात. मारबत ही जवळपास सारख्याच स्वरुपाची असली तरी ‘बडगे’ मात्र वेगवेगळ्या विषयांवर असतात. हे विषय मिरवणूक निघाल्यावरच कळतात. बहुदा एखाद्या बड्या राजकीय व्यक्तिमत्त्वाची प्रतिकृतीही विशेष आकर्षण असते. म्हणूनच ‘मारबत’ व ‘बडगे’ ही मिरवणूक नागपूरच्या वैशिष्ट्यात भर टाकणारी आहे. यंदा पिवळी मारबतला १३४ तर काळी मारबतला १३८ वर्ष पूर्ण झाली आहेत.
( छायाचित्रे - मुकेश कुकडे, संजय लचुरिया)