‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्यावर मेहेरबानी कशासाठी?
By admin | Published: June 16, 2014 04:09 AM2014-06-16T04:09:02+5:302014-06-16T04:09:02+5:30
पोलीस भरतीप्रक्रियेदरम्यान १०० मीटरचा ट्रॅक ८० मीटरचा झाल्याच्या प्रकरणाची गोपनीय चौकशी होऊन सदरचा अहवाल पोलीस महासंचालकांना धाडण्यात आला आहे
नाशिक : पोलीस भरतीप्रक्रियेदरम्यान १०० मीटरचा ट्रॅक ८० मीटरचा झाल्याच्या प्रकरणाची गोपनीय चौकशी होऊन सदरचा अहवाल पोलीस महासंचालकांना धाडण्यात आला आहे. मात्र त्यात एका पोलीस कर्मचाऱ्यावर मेहेरबानी कशासाठी, याचीच चर्चा पोलीस वर्तुळात आहे.
सदरच्या अहवालामध्ये क्रीडा प्रकाराशी संबंधित एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढण्यात आल्याचे समजते. संबंधित कर्मचाऱ्याकडून पोलीस मुख्यालयातच पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र चालविले जात असल्याचा उल्लेख अहवालात करण्यात आल्याचे समजते. नेहमीच अति‘दक्ष’ असणाऱ्या पोलीस आयुक्तांकडून ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्यावर मेहेरबानी कशासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे.
शहर पोलीस भरतीची प्रक्रिया सध्या अनेक प्रकारांनी वादग्रस्त ठरू पाहत आहे. भरतीच्या पहिल्याच दिवशी १०० मीटरचा ट्रॅक ८० मीटर केल्याची बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांच्या गोपनीय विभागाकडून चौकशी करण्यात येऊन सदरचा अहवाल नुकताच पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांना धाडण्यात आल्याचे समजते. यात पहिल्या दिवसाच्या ट्रॅकची आखणी जाणीवपूर्वक केल्याचे समजते. भरतीच्या मैदानाची आखणी पोलीस दलातीलच एका पोलीस कर्मचाऱ्याकडून करण्यात आली होती.
सदरचा कर्मचारी हा क्रीडा क्षेत्रातला असून, पोलीस मुख्यालयाच्या आवारातच तो पोलीस प्रशिक्षण भरती केंद्रही चालवितो. मुळात पोलीस मुख्यालयाच्या आवारात अशा प्रकारचे केंद्र चालविणे बेकायदा आहे.
संबंधित कर्मचाऱ्यावर यापूर्वीही पोलीस भरतीप्रक्रियेदरम्यान वशिलेबाजी केल्याचा आरोप झाल्याचे समजते. त्यामुळे त्यास भरतीप्रकियेपासून दूर ठेवण्यात आले असतानाही या वेळी त्याच व्यक्तीवर मैदानाची आखणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)