राजकारणात पदव्यांचा सोस कशासाठी?
By Admin | Published: June 26, 2015 09:56 AM2015-06-26T09:56:51+5:302015-06-26T09:56:51+5:30
सध्या राजकारणात खोट्या पदव्या दाखवतात. सर्वत्र पदव्यांचा सोस कशासाठी, हेच कळत नाही असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेत्यांना लगावला.
मुंबई : सध्या राजकारणात खोट्या पदव्या दाखवतात. सर्वत्र पदव्यांचा सोस कशासाठी, हेच कळत नाही. जे कराल ते अस्सल करा, उगाच खोट्याच्या मागे का लागता, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेत्यांना लगावला.
शिवसेना नेते मनोहर जोशी लिखित ‘धंदा कसा करावा’ या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. आम आदमी पार्टीचे नेते रामसिंह तोमर यांच्या बोगस पदवीचे प्रकरण बाहेर आल्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी व राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या पदव्यांबाबतही जोरदार आक्षेप नोंदवण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपा नेत्यांना सुनावले. माझे आजोबा आणि बाळासाहेब हे ६ वी पास होते. फी भरायला पैसे नाहीत म्हणून शिक्षण सोडावे लागले, असे सांगून ‘अस्सल’चे महत्त्व अधोरेखित केले.
मुंबईतील नालेसफाईच्या चौकशीची मागणी करतानाच या कामाची श्वेतपत्रिका काढणार असल्याचे मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटले होते. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी पावसामुळे झालेल्या गुजरातमधील दुरवस्थेचे संदर्भ देत अहमदाबादमधील नालेसफाईचीही चौकशी करणार का, असा सवाल केला.
महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप गंभीर असल्याचे सांगतानाच मुख्यमंत्रीच या संदर्भात काय तो निर्णय घेतील, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.