नव्या महापौरांचे निवासस्थान राणीच्या बागेत का ?
By admin | Published: February 27, 2017 05:21 PM2017-02-27T17:21:08+5:302017-02-27T18:07:12+5:30
महापौर बंगल्यात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव आज मुंबई महापालिका सभागृहात एकमताने मंजुर करण्यात आला.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - दादर येथील महापौर बंगल्यात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव आज मुंबई महापालिका सभागृहात एकमताने मंजुर करण्यात आला. महापौर बंगल्यामध्ये स्मारक उभे राहिल्यानंतर महापौरांचे निवासस्थान भायखळा येथील राणीच्या बागेत हलवण्यात येण्याची शक्यता आहे. पालिका सभागृहात कोणत्याही चर्चेविना हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. 'स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारक न्यासामार्फत' स्मारकाची उभारणी केली जाईल.
महापौर बंगल्याची जागा स्मारकाला दिल्यानंतर राणीच्या बागेमधील एका जुन्या बंगल्यात महापौरांचे निवासस्थान असेल अशी चर्चा आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत या मुद्यावरुन जोरदार राजकारण तापले होते. महापौर बंगल्याची जागा बाळासाहेबांच्या स्मारकासाठी वापरण्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विरोध आहे.
बाळासाहेबांच्या स्मारकाच्या आडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा महापौर बंगल्यावर डोळा आहे असा आरोप राज यांनी केला होता. उद्धव ठाकरेंची नजर समुद्रकिनारी वसलेल्या महापौर बंगल्यावर आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या नावाखाली उद्धव ठाकरेंना तो बंगला हडपायचा आहे असा स्पष्ट आरोप त्यांनी केला होता. महापौर बंगल्याच्या जागी स्मारक आणि महापौरांचा बंगला राणीच्याबागेत. जिथे एकही प्राणी नाहीय. लोक तिथे महापौरांना बघायला येणार अशी टीका राज यांनी केली होती.