मी आता कोणती भूमिका घेऊ? राधाकृष्ण विखे
By अतुल कुलकर्णी | Published: March 20, 2019 06:12 AM2019-03-20T06:12:39+5:302019-03-20T06:30:30+5:30
पुत्र डॉ. सुजय यांच्या भाजपाप्रवेशामुळे राजकीयदृष्ट्या कोंडित सापडलेले काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राजीनामा दिल्याची चर्चा होती.
- अतुल कुलकर्णी
मुंबई - पुत्र डॉ. सुजय यांच्या भाजपाप्रवेशामुळे राजकीयदृष्ट्या कोंडित सापडलेले काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राजीनामा दिल्याची चर्चा होती. मात्र, त्यांनी स्वत:च त्याचा इन्कार केला असला तरी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून ‘मी आता काय कोणती भूमिका घेऊ?’ अशी विचारणा विखे यांनी केली आहे.
निवडणूक प्रचारात विरोधी पक्ष नेतेच जर त्यांच्या जिल्ह्यात पक्षाचे काम करणार नसतील तर पक्षासाठी काम न करणाऱ्या कार्यकर्त्यांना कोणत्या तोंडाने जाब विचारायचा, असा प्रश्न काँग्रेसमधील अन्य नेत्यांना पडला आहे. त्यामुळे विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी पक्षांतर्गत दबाव वाढत आहे.
डॉ. सुजय विखे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनाही भेटायला गेले होते. त्यांच्याशी बोलून निघताना ‘तुम्ही काहीही निर्णय घ्या, पण मी उभे राहणारच आहे’ असे त्यांनाही ऐकवले होते. त्यामुळे पवारांचीही नाराजी त्यांनी ओढावून घेतली.
विखे यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेऊन सुजय माझे ऐकत नाही, असे गाऱ्हाणे घातले होते. त्यावर राहुल गांधी यांनी सुजयशी फोनवर बोलणे केले होते. तुम्हाला नंतर योग्य संधी देऊ, आता तुम्ही पक्ष सोडू नका, असेही सांगितले होते. तरीही सुजय यांनी भाजपात प्रवेश केला.
दरम्यान, चिरंजीव डॉ. सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताने मंगळवारी एकच खळबळ उडाली. मात्र आपण पक्षाकडे राजीनामा दिला नसल्याचा खुलासा विखे यांनी माध्यमांकडे केल्याने राजीनामा नाट्यावर अखेर सायंकाळी पडदा पडला.