शिवसेना सध्या काय करतेय..?
By admin | Published: March 3, 2017 06:03 AM2017-03-03T06:03:15+5:302017-03-03T06:03:15+5:30
महापौरपदी शिवसेनेचा नगरसेवक विराजमान करायचा आणि नंतर राज्याच्या सत्तेविषयी निर्णय घ्यायचा अशी भूमिका सध्या सेनेने घेतली
अतुल कुलकर्णी,
मुंबई- एकमेकांवरील प्रचंड चिखलफेकीनंतर शिवसेना-भाजपातील संबंध कमालीचे ताणले गेले असताना सरकारमध्ये भाजपासोबत कोणत्या तोंडाने राहायचे? राहिलो तर सत्तेसाठी लाचारी पत्करल्याचा ठपका बसेल त्याचे काय? सत्तेत राहिलो तर त्याचेही भांडवल करून भाजपाने आपलीच बदनामी केली तर? असे एक ना दोन अनेक प्रश्न सध्या शिवसेनेला पडले आहेत. त्यामुळेच महापौरपदी शिवसेनेचा नगरसेवक विराजमान करायचा आणि नंतर राज्याच्या सत्तेविषयी निर्णय घ्यायचा अशी भूमिका सध्या सेनेने घेतली आहे.
शिवसेनेने आपल्याला मुंबई महापालिकेत सोबत घेतले नाही तर काय करायचे म्हणून भाजपानेदेखील ‘प्लॅन बी’वर काम करणे सुरू केले आहे. आम्ही कोणत्याही स्थितीत भाजपा, शिवसेनेसोबत जाणार
नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी जाहीर केले आहे. काँग्रेसने मात्र अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. भाजपा सत्तेवर नको त्यासाठी शिवसेनेचा महापौर चालेल अशी चर्चा काँग्रेस, राष्ट्रवादीसह मनसे आणि अन्य विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये सुरू झाली आहे. शिवसेना खा. संजय राऊत यांनी आम्ही काँग्रेसची मदत घेणार नाही, पण भाजपाला काश्मिरात मेहबुबा मुफ्तींची मदत कशी चालते, असे सांगून या चर्चेला वेगळेच वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. राऊत यांचे हे अवेळी बोलणे शिवसेनेच्या नेत्यांची डोकेदुखी झाल्याचे एका नेत्याने स्पष्ट केले.
दरम्यान, २५ वर्षे युतीत सडली असे आपणच सांगितले आणि आता सत्तेसाठी त्याच युतीत जायचे की सत्तेची पर्वा न करता बाहेर पडण्याचे ठोस कारण शोधायचे याच्या शोधात सध्या शिवसेनेचे नेते व्यस्त आहेत. महापौर तर आपलाच करू, पण राज्यातल्या सत्तेत राहायचे की नाही हा यक्षप्रश्न सध्या सेनेपुढे आहे. निवडणूक काळात व्यक्तिगत पातळीवर जाऊन स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्ले केले, मातोश्रीवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तरीही आपण सत्तेत राहिलो तर शिवसेनेचीच प्रचंड बदनामी होईल आणि भाजपाला तर तेच हवे आहे, म्हणून तर भाजपा नरमाईची भूमिका घेण्याचे नाटक करत आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगण्यात आले आहे. दिल्लीतून नरमाईची भूमिका घेण्याच्या सूचना आल्या अशा खोट्या बातम्या म्हणूनच पेरण्यात आल्या.
वास्तविक सेनेला तोडण्याची हीच चांगली वेळ आहे, असे मोदी-शहा जोडीने सांगितल्याचे समजते. पण हे आॅपरेशन आपण आपल्या पद्धतीने करू, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्याचे समजते.
महापौर शिवसेनाचा झाला की अर्थसंकल्पीय अधिवेशनात विनियोजन बिलाच्या वेळी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा विचारही शिवसेनेत चर्चेला आल्याचे सूत्रांनी सांगितले. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्या, नाही तर पाठिंबा काढायचा असाही एक सूर शिवसेनेत आहे.
प्रचाराच्या काळात आलेल्या कटुतेमुळे आणि भाजपा नेत्यांच्या राजकारणामुळे उद्धव ठाकरे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या घरच्या लग्नास गेले नाहीत. ठाकरेंनी आपल्या घरच्या लग्नाला यावे यासाठी दानवे यांनी खूप प्रयत्न केले, पण त्यात त्यांना यश आले नाही.
>सेना-राष्ट्रवादीची चर्चा झाल्याची माहिती
आपल्या मदतीने राज्यात भाजपाने सरकार चालवायचे आणि वर आपल्याच पक्षाला कमजोर करायचे ही रणनीती पक्षासाठी घातक असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेची आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची वरिष्ठ पातळीवर बोलणी झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेना अन्य पक्षाच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करू शकेल असे चित्र वाटू लागले तर भाजपातला एक गट आपल्या संपर्कात आहे, असा दावा राष्ट्रवादीने केला आहे.