कोरोना विषाणूच्या उच्चाटनासाठी राज्य सरकारने काय करायला हवे?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 02:14 AM2021-04-05T02:14:09+5:302021-04-05T02:14:27+5:30
वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर, विविध संघटनांचे पदाधिकारी, विविध घटकांच्या प्रतिनिधींनी कोरोना रोखण्यासंदर्भात सरकारला काही सूचना केल्या आहेत.
कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांनी त्यांची मते जाणून घेतली, अनेक उपाययाेजनांचा आढावा घेतला. त्यानंतर राज्य सरकारने कठोर निर्बंधांसह अंशतः लॉकडाऊन जाहीर केला. त्यानंतरही वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर, विविध संघटनांचे पदाधिकारी, विविध घटकांच्या प्रतिनिधींनी कोरोना रोखण्यासंदर्भात सरकारला काही सूचना केल्या आहेत. या मतांचा सरकार नक्की विचार करेल. या सूचनांचा संक्षिप्त आढावा...
लोकांवर उपासमारीने मरण्याची वेळ येऊ नये
‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी शासन आणि जनतेची अवस्था झाली आहे. कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी वर्क फ्रॉम होमची कडक अंमलबजावणी करावी. बगीचे, पार्क, समुद्रकिनारे,पर्यटन क्षेत्रे तसेच मंदिरे आदी सर्वच ठिकाणे बंद केले जावेत. शाळा आणि महाविद्यालये आॅनलाईन सुरू आहेतच. मोठया गर्दीत पार पडणारे लग्न सोहळे, राजकीय सभा यावर निर्बंध हवेत. कामगारांचा रोजगार हिरावून न घेता बस आणि ट्रेनमधील गर्दी टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यायला हवी. जे करायचे ते नियोजन करून सर्व निर्णय जनतेपर्यंत पोहोचायला हवेत. आर्थिक घडी विस्कटू न देता योग्य समन्वय साधण्याची गरज आहे. वातावरण पाहून गरजेच्या वस्तू दुप्पट भावाने विकणाऱ्या दुकानदारांवर स्थानिक प्रशासनाने अंकुश ठेवण्याची गरज आहे. अन्यथा कोरोनाऐवजी उपासमारीने आणि महागाईने मरायची वेळ हातावर पोट असणाऱ्यांवर ओढवू शकते, हेही लक्षात ठेवले पाहिले.
- प्रा.संतोष राणे,
लेखक तथा प्रकाशक, ठाणे
‘लोकांचे मृत्यू होण्यापेक्षा कठोर निर्बंध आवश्यक’
अनेकांनी कोविडला गृहितच धरले नाही. त्यामुळेच मार्केट आणि उपनगरी रेल्वेमध्ये गर्दी होते. नियोजनाशिवाय झालेले नागरिकरण, वाढत्या वस्त्या यातून होणारी गर्दी ही वाढत्या रुग्णांना कारणीभूत आहे. शहरीकरणाचे आणि आरोग्य यंत्रणेचे नियोजन नाही. आजार आल्यावरच नागरिक आणि सरकारी यंत्रणा जागी झाली. त्यामुळेच स्वयंशिस्त गरजेची आहे. अगदी लॉकडाऊन नाही, पण कडक निर्बंध करणे आवश्यक आहे. लोकांचे मृत्यू होण्यापेक्षा कठोर निर्णय हे घ्यावेच लागतील. केवळ सरकारवर जबाबदारी टाकून जमणार नाही.
- डॉ. महेश बेडेकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, ठाणे
मास्कची सक्ती आणि गर्दीवर नियंत्रण गरजेचे
कोरोना काळात प्रत्येकाचीच वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक घडी विस्कटली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काटेकोर नियमावली तसेच त्याच्या अंमलबजावणीची गरज आहे. लग्न, सार्वजनिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, सभा-संमेलन या ठिकाणच्या गर्दीवर नियंत्रण, मास्कची सक्ती तर असायलाच हवी. पण त्याचबरोबर नियम मोडणाऱ्यांना कठोर शासन होणे गरजेचे आहे. ज्याज्या आस्थापनांना शक्य आहे, त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा व त्यासाठी आवश्यक त्या सोयी पुरविणे हीच काळाची गरज आहेेे.
- प्रज्ञा पंडित, लेखिका, कवयित्री, समीक्षक, ठाणे
नागरिकांनी स्वतःच लॉकडाऊन व्हावं
सध्याची स्थिती अतिशय गंभीर असून कोरोनावर नियंत्रण आणणे ही प्रत्येक नागरिकाचीच जबाबदारी आहे. लॉकडाऊन लावण्याची वेळ शासनाला आणायला लावण्यापेक्षा सध्या वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांनी स्वतः लॉकडाऊन झालं पाहिजे. म्हणजेच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. मार्केटमध्ये खरेदीसाठी दररोज जाण्याची गरज नाही. आणि ज्यावेळी गर्दी नसेल त्यावेळी बाहेर पडावं. त्याशिवाय मास्क, सोशल डिस्टन्स, हातांची स्वच्छता आदी सुरक्षा नियमांचे पालन केल्यास कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नक्कीच मात करता येईल.
- अच्युत पालव, सुलेखनकार
‘आता लॉकडाऊन ही काळाची गरज ’
लॉकडाऊन कमीत कमी २० दिवसांचा करणे गरजेचे आहे. गरजूंना तीन आठवडयाचा शिधा पुरवून हा लॉकडाऊन केला जावा. यासाठी गरज आहे, ती स्थानिक प्रशासनाला विश्वासात घेऊन काम करण्याची. सर्व घटकांची मानसिक तयारी करून हा लॉकडाऊन केला जावा.
-महेंद्र काशिनाथ मोने,
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, ठाणे
लॉकडाऊन हा योग्य पर्याय नाही
संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. दंडाची रक्कम वाढवा. जे व्यावसायिक नियमांचे उल्लंघन करतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन त्यांचे परवाने रद्द करा. अशा बेजबाबदार लोकांमुळे जबाबदार लोकांवर अन्याय करणे योग्य नाही.
-सुशांत पाटील, वकील, मीरा भाईंदर
..तर कोरोनाला दूर ठेवणे सहज शक्य
नियमांचे पालन झाले तर कोरोनाला दूर ठेवणे शक्य आहे. परंतु नागरिकांकडून नियम पाळले जात नाहीत. १५ ते २० टक्के नागरिकच नियम पाळताना दिसतात. आता कडक निर्बंध लावण्याची सरकारवर वेळ आली आहे. त्याचे तरी आता कठोर पालन होणे गरजेचे आहे.
- डॉ. स्वाती गाडगीळ,
भूलतज्ज्ञ, डोंबिवली
विनाकारण फिरणाऱ्यांवर कठोर निर्बंध हवेत
लॉकडाऊन परवडणारे नाही. सकाळी नागरिक कामानिमित्ताने बाहेर पडतात. पण संध्याकाळी उद्यानात जाणारे तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई अपेक्षित आहे. निर्बंधांचे पालन होणे आवश्यक आहे. तरच संक्रमणाची साखळी तोडणे सोपे होईल.
- ॲड. अनिरूध्द कुलकर्णी,
वकील, डोंबिवली
लसीकरणातील अडचणी दूर करण्याची गरज
कोरोना हा संसर्गजन्य विषाणू असल्याने नागरिकांनी स्वत:च काळजी घेतली पाहिजे. राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. परंतू सरकारने लसीकरण वाढविण्यावर भर दिला पाहिजे. लसीकरण सहजरित्या कसे उपलब्ध होईल याकडेही लक्ष दिले गेले पाहिजे. कारण लसीकरणासाठी नोंदणी करण्यासाठी जी संकेतस्थळे दिलेली आहेत, त्यावर नोंद करण्यासंदर्भात अनेक अडचणी येत आहेत याची नोंद सरकारने घेतली पाहिजे.
- महेश निंबाळकर, सामाजिक कार्यकर्ते, डोंबिवली
कडक निर्बंधांचे पालन करणे हेच कोरोनापासून बचावाचे शस्त्र
सोशल डिस्टन्सिंग आणि तोंडावर मास्क लावणे हे नियम पाळण्याबरोबरच सरकारने घालून दिलेले नियम काटेकोरपणे पालन करणे हेच कोरोनापासून बचाव करण्याचे प्रमुख शस्त्र आहे. लसीकरण वाढविणे गरजेचे असून जास्तीत जास्त तरूणांना आता लस देणे महत्वाचे आहे. जेणोकरून खऱ्या अर्थाने कोरोना संसर्गाला ब्रेक लावणे शक्य होईल. ज्या वयोगटासाठी लसीकरण सुरू झाले आहे त्या वयामधील सर्व नागरिकांनी लस घेतली आहे की नाही, याची नोंद कटाक्षाने सरकारने घेणे गरजेचे आहे.
- रोहिणी नाईक, शिक्षिका, डोंबिवली