झालं समाधान ? पाकिस्तानच्या कोलांटीउडीवरून उद्धव ठाकरेंचे सरकारवर टीकास्त्र
By admin | Published: April 6, 2016 07:54 AM2016-04-06T07:54:26+5:302016-04-06T07:56:12+5:30
ठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर झालेला हल्ला भारतीय अधिका-यांनीच रचल्याचा दावा पाकिस्तानने केल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर झालेला हल्ला भारतीय अधिका-यांनीच रचल्याचा दावा पाकिस्तानने केल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ' पठाणकोटचा हल्ला म्हणजे हिंदुस्थानचा ड्रामा आहे, असा अहवाल पाकिस्तानी पथकाने दिला आहे. पाकड्यांना पायघड्या अंथरण्याचेच हे फळ आहे. झाले समाधान? देशातील राष्ट्रभक्त जनतेच्या वतीने हा आमचा सरकारला हा सवाल आहे!' असे उद्धव यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानी पथकाला हिंदुस्थानात येऊन चौकशी करण्याची परवानगी देऊ नका, असे आम्ही एका तळमळीने केंद्र सरकारला सांगत होतो. मात्र सरकारने कोणाचेही न ऐकता आपला हट्ट पूर्ण केला. म्हणजे मित्राचे काही एक ऐकायचे नाही आणि शत्रू देशावर मात्र नको तितका विश्वास ठेवायचा असा हा उफराटा न्याय! अशी घणाघाती टीका त्यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून सरकारवर केली आहे. 'पाकिस्तानने पाठीत असा खंजीर खुपसल्यानंतर तरी आपण शहाणे व्हायला हवे होते. मात्र ज्यांनी हल्ला घडवला त्यांनाच आपण चौकशी अधिकारी म्हणून आपल्या देशात बोलावले' असेही उद्धव यांनी म्हटले.
काय म्हटले आहे अग्रलेखात?
- पाकड्यांविषयी आम्ही वेळोवेळी जे इशारे केंद्रीय सरकारला देत आलो ते इशारे प्रत्येक वेळी दुर्दैवाने का होईना खरे ठरले आहेत. आताही तेच घडले आहे. पठाणकोटच्या हवाई तळावरील दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीसाठी आलेल्या पाकिस्तानी पथकाने पाकिस्तानात पाऊल ठेवताच आपली जात दाखवली आहे. पठाणकोट हल्ल्याविषयी हिंदुस्थान सरकारने दिलेले सर्व पुरावे पाकिस्तानच्या ‘जेआयटी’ ने सपशेल धुडकावून लावले असून पठाणकोट हल्ला म्हणजे हिंदुस्थान सरकारनेच घडवलेला ड्रामा आहे, असे बेअक्कल तारे पाकिस्तानी पथकाने आपल्या अहवालात तोडले आहेत.
- पाकिस्तानातील सर्व अतिरेकी संघटनांचा बाप असलेल्या हाफिज सईदने जाहीर सभेत पठाणकोट हल्ल्याची तारीफ करून अतिरेक्यांना शाबासकी दिली होती. तो एक प्रकारचा कबूलनामाच होता. तरीही जेआयटीचे नाटक कशासाठी वठवले गेले, हे कळण्यास मार्ग नाही. पाकिस्तानी पथकाचा हा बकवास अहवाल पंतप्रधान नवाज शरीफ यांना सादर होण्यापूर्वीच फुटला आहे. पाकिस्तानी मीडियाने या अहवालाचा भंडाफोड करून आता हिंदुस्थानलाच आरोपीच्या पिंजर्यात उभे केले आहे. म्हणजे हिंदुस्थानने स्वत:च हा हल्ला घडवून केवळ पाकिस्तानला बदनाम करण्यासाठी पठाणकोटच्या हवाई तळावर नाटक घडवले असा बेशरमपणाचा कळस गाठणारा निष्कर्ष या अहवालातून काढण्यात आला आहे. म्हणजे हिंदुस्थानात यायचे आणि हिंदुस्थानच्या छाताडावर पाय ठेवून आमच्याच कानफटात मारायची अशी ही नामुष्की आहे.
- आता पाकिस्तानला तरी दोष देऊन काय उपयोग? पाकिस्तानी पथकाला हिंदुस्थानात येऊन चौकशी करण्याची परवानगी देऊ नका, असे आम्ही एका तळमळीने केंद्र सरकारला सांगत होतो. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद थांबवत नाही तोपर्यंत त्यांच्याशी कोणतेही संबंध ठेवू नका. कुठलीही बोलणी, शांतता चर्चा करू नका, हीच शिवसेनेची सदैव भूमिका राहिली आहे. मात्र सरकारने कोणाचेही न ऐकता आपला हट्ट पूर्ण केला. म्हणजे मित्राचे काही एक ऐकायचे नाही आणि शत्रू देशावर मात्र नको तितका विश्वास ठेवायचा असा हा उफराटा न्याय!
- पंतप्रधान नरेंद्र मोदी लाहोरला जाऊन पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा पाहुणचार घेऊन आले तेव्हादेखील आम्ही ‘पाकिस्तानवर विश्वास ठेवू नका, धोका होईल!’ हाच इशारा दिला होता. अखेर धोका झालाच. मोदी यांच्या पाक दौर्यानंतर आठवडाभरातच ‘जैश’ च्या पाकड्या अतिरेक्यांनी पठाणकोटच्या हवाई तळावर दहशतवादी हल्ला केला. सहा पाकडे अतिरेकी आपण ठार मारले, पण आमचे तीन जवान या हल्ल्यात शहीद झाले. पाकिस्तानने पाठीत असा खंजीर खुपसल्यानंतर तरी आपण शहाणे व्हायला हवे होते. मात्र ज्यांनी हल्ला घडवला त्यांनाच आपण चौकशी अधिकारी म्हणून आपल्या देशात बोलावले. शिवसेनेने तेव्हाही विरोध केलाच. पठाणकोट हल्ल्यात पाकड्यांचा हात आहे हे सार्या जगाला ठाऊक असताना पाकिस्तानच्या पथकाला चौकशीसाठी हिंदुस्थानात बोलावण्याची गरजच काय? असा सवालही आम्ही केला होता.
- सर्वात मोठा विनोद असा की आयएसआयच्या एका बड्या अधिकार्याचाही या पथकात समावेश होता. हिंदुस्थानवर आजपर्यंत झालेल्या प्रत्येक दहशतवादी हल्ल्याचा प्लॅन आयएसआयनेच रचला हा इतिहास आहे. त्या प्लॅननुसार अतिरेकी हिंदुस्थानात घुसून हल्ले चढवतात, हे आपल्या सरकारांनीच अनेकदा सांगितले आहे. तरीही आयएसआयचा लेफ्टनंट कर्नल तन्वीर अहमद पठाणकोटच्या हवाई तळावर उभा राहून हिंदुस्थानवरील हल्ल्याची चौकशी करतो, हेच मुळात ढोंग होते. ते कशासाठी केले याचे उत्तर राज्यकर्त्यांना द्यावेच लागेल. हिंदुस्थानात दहशतवादी हल्ले घडवणे, हा पाकिस्तानच्या पराराष्ट्र धोरणाचा अविभाज्य भाग आहे. पठाणकोटचा हल्ला पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयच्या आराखड्यानुसारच झाला हेदेखील सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ होते. तरीही पाकिस्तानी पथकाच्या स्वागतासाठी पायघड्या अंथरण्याचे काम आपल्या सरकारने केले. पठाणकोटचा हल्ला म्हणजे हिंदुस्थानचा ड्रामा आहे, असा अहवाल आता पाकिस्तानी पथकाने दिला आहे. पाकड्यांना पायघड्या अंथरण्याचेच हे फळ आहे. झाले समाधान? देशातील तमाम राष्ट्रभक्त जनतेच्या वतीने आमचा सरकारला हा सवाल आहे!