कोणता शनी आडवा आला?
By admin | Published: October 7, 2016 06:06 AM2016-10-07T06:06:15+5:302016-10-07T06:06:15+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विरोधकांच्या कुंडल्या असतील तर त्यांनी त्या उघड का केल्या नाहीत, कोणता शनी आडवा आला
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विरोधकांच्या कुंडल्या असतील तर त्यांनी त्या उघड का केल्या नाहीत, कोणता शनी आडवा आला, दिल्लीचा की जळगावचा, असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांच्या कुंडल्या आपल्याकडे असून, त्या योग्य वेळी बाहेर येतील, असे वक्तव्य केले होते. विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या त्या विधानाचा समाचार घेतला. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांकडे विरोधकांच्या कुंडल्या असतील तर त्या उघड करण्यासाठी योग्य वेळेची वाट बघण्याची काय गरज आहे? त्यांच्या विधानातून केवळ राजकीय द्वेषभावनेतून विरोधकांना वेठीस धरण्याची मानसिकता समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांचे हे विधान त्यांनी घेतलेल्या शपथेचा भंग आहे. मुख्यमंत्र्यांना एखाद्या चुकीच्या गोष्टीची माहिती मिळाली असेल, तर त्यावर संविधानानुसार कारवाई व्हायला हवी. परंतु त्याऐवजी त्या माहितीचा राजकीय सोयीनुसार वापर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच म्हणजे विरोधी पक्षांना धमकावण्याचा प्रकार आहे. अशा धमकीसत्राला न घाबरता राज्य सरकारचा बुरखा फाडण्याचे काम आम्ही सुरूच ठेवू, असा इशाराही विखे यांनी दिला.
कुंडल्या वाचण्याचा एवढाच शौक असेल तर त्यांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला खा. किरीट सोमय्या यांचा जबाब नोंदवून त्यानुसार कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही विखे पाटील यांनी केली. (विशेष प्रतिनिधी)