खासगी कंपन्यांवर उधळपट्टी कशासाठी? -अशोक चव्हाण यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 05:24 AM2017-10-16T05:24:48+5:302017-10-16T05:25:11+5:30
सरकारच्या कामाची व धोरणांची प्रसिद्धी करण्यासाठी सरकारकडे स्वतंत्र माहिती व जनसंपर्क विभाग कार्यरत असताना जनतेच्या खिशातील ३०० कोटी रुपये खर्चून सरकारच्या प्रसिद्धीचे काम खासगी कंपन्यांना कशासाठी...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सरकारच्या कामाची व धोरणांची प्रसिद्धी करण्यासाठी सरकारकडे स्वतंत्र माहिती व जनसंपर्क विभाग कार्यरत असताना जनतेच्या खिशातील ३०० कोटी रुपये खर्चून सरकारच्या प्रसिद्धीचे काम खासगी कंपन्यांना कशासाठी, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सरकारला केला आहे.
प्रसिद्धीसाठी सरकार खासगी कंपन्यांची नियुक्ती करणार असल्याच्या वृत्तानंतर अशोक चव्हाण यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे सरकारवर टीका केली. एकीकडे सरकार जाहिरातींवर हजारो कोटी रुपये उधळत असताना आता पुन्हा नव्याने सरकारच्या प्रचारासाठी उधळपट्टी कशाला, असा सवालही चव्हाण यांनी केला.
सध्या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जनतेत तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनता सरकारविरोधात आपला रोष व्यक्त करीत आहे. त्यामुळे सरकारने सोशल मीडियाचा चांगलाच धसका घेतला आहे. या भीतीपोटीच सोशल मीडियावर सरकारविरोधात पोस्ट लिहिणाºया युवक आणि पत्रकारांना नोटिसा पाठविल्या जात आहेत. परंतु अशा नोटिसा पाठवून सरकार जनतेचा आवाज दाबू शकत नाही. विरोधी पक्ष म्हणून आम्ही युवकांच्या पाठीशी आहोत, असे चव्हाण म्हणाले.