मंत्रिमंडळात एक तरी खरा शेतकरी आहे काय?, उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल

By admin | Published: June 7, 2017 08:00 AM2017-06-07T08:00:15+5:302017-06-07T08:02:14+5:30

तुमच्या मंत्रिमंडळात एक तरी खरा शेतकरी आहे काय? असा खोचक सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे

What is a true farmer in the cabinet?, Uddhav Thackeray's hollow question | मंत्रिमंडळात एक तरी खरा शेतकरी आहे काय?, उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल

मंत्रिमंडळात एक तरी खरा शेतकरी आहे काय?, उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - मुख्यमंत्र्यांनी एक चांगली भूमिका घेतली आहे. ते म्हणतात, यापुढे फक्त शेतकरी नेत्यांशीच चर्चा करू. पण हे शेतकरी नेते कोण? तुम्ही सदाभाऊ व जयाजी सूर्यवंशीशी बोललात. शेतकऱ्यांनी त्यांना मानलेच नाही. आमची एक उपसूचना यावर आहे. वाटल्यास हरकतीचा मुद्दा समजावा. शेतकरी नेत्यांशी फक्त सरकारातील खऱ्या शेतकऱ्यांनीच बोलावे! तुमच्या मंत्रिमंडळात एक तरी खरा शेतकरी आहे काय? असा खोचक सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. 
 
राजू शेट्टी यांनी असे ठणकावले आहे की, सरकारला पाठिंबा दिल्याचा आता पश्चात्ताप होत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लवकरच सरकारमधून बाहेर पडू असेही त्यांनी सुनावले आहे. शेतकऱ्यांच्या संपास आणि ‘महाराष्ट्र बंद’ला प्रचंड यश मिळाले आहे. त्यानंतर राजकीय जोडे बाजूला काढून शेतकरी संघटनांचे अनेक जुनेजाणते पुढारी एकत्र आले आहेत. ‘फोडा, झोडा’ नीतीचा प्रयोग करूनही तो यशस्वी झाला नाही. नेत्यांत मतभेद असले तरी शेतकरी एकवटला व सरकारला घाम फोडला हे महत्त्वाचे. आता पुढे काय? हाच प्रश्न असला तरी एकत्र आलेल्या शेतकरी नेत्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पुढाऱ्यांप्रमाणे वागू नये असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला आहे. 
 
लढणा-यांना गळास लावायचे व त्या स्फोटक बॉम्बची वात काढून घ्यायची आणि बॉम्बचा रबरी चेंडू बनवायचा हे प्रकार काँग्रेसने याआधी केले व महाराष्ट्रातील फडणवीस सरकार याबाबत काँग्रेसचे अनुकरण शतप्रतिशत करताना दिसत आहे. इतर बाबतीत भारतीय जनता पक्षाचे काँग्रेसशी तीव्र म्हणजे टोकाचे मतभेद आहेत. काँग्रेसमुक्त हिंदुस्थानचे त्यांनी मनावर घेतलेच आहे, पण काँग्रेसची काही ध्येयधोरणे मात्र त्यांनी पवित्र करून नव्हे तर जशीच्या तशी स्वीकारली आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. 
 
चळवळे व आंदोलक लोकांना जाळ्यात पकडून त्यांचे फुसके आपटी बार करायचे. रामदास आठवले वगैरेंची फुसकुली काँग्रेसने केली तशी फडणवीस यांनी सदाभाऊंची केली. जादूगार कबुतराची कोंबडी करतो किंवा सशाचे मांजर करतो हे माहीत होते, पण फडणवीस यांनी विंचवाचे साफ झुरळ करून टाकले. हा जादुई प्रयोग शरद पवारांनाही जमला नसता असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर उपरोधक टीका केली आहे.
 
‘एखाद्याने इतकेही स्वतःला बदलू नये की, त्याचा सदाभाऊ होईल’ असे टवाळकीने का म्हटले जात आहे याचा विचार सत्तेच्या कच्छपि लागलेल्या चळवळ्यांना आता करावाच लागेल. महादेव जानकरांची सध्याची राजकीय अवस्था काय आहे हे ते स्वतःदेखील सांगू शकणार नाहीत. लढणाऱ्यांना नपुंसक बनवून किंवा त्यांच्या चळवळीची नसबंदी करून राज्यकर्ते नेहमीच शांतता विकत घेत असतात, पण नेते गळास लागले तरी जनतेच्या मनातील संताप लाव्हा बनून उफाळून येतच असतो. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या बाबतीत तेच घडले आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
जयाजी सूर्यवंशी व धनंजय जाधव यांचे नेतृत्व संशयाच्या भोवऱ्यात ओढण्याची चाल सरकारने खेळली. ती एका रात्रीपुरती यशस्वी झाली, पण राजकारणातील कारस्थाने सदान्कदा यशस्वी होत नाहीत. काही गोष्टी राज्यकर्त्यांनी गांभीर्याने करावयाच्या असतात. पंचायतीपासून महानगरपालिकेपर्यंतच्या निवडणुका जिंकणे सोपे आहे. सत्ता व पैसा हाती असला तर चंद्रावरही निवडणुका जिंकता येतील. याचा अर्थ लोक तुमचे गुलाम आहेत असे गृहीत धरता येत नाही. राजकारणात सदाभाऊंची पैदास करण्यापेक्षा जनतेच्या लढ्याची भावना समजून घ्या असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
 
दुसरे महत्त्वाचे असे की, ‘राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे’ या ऐतिहासिक सत्याची चाड महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी ठेवायला हवी. रस्त्यावर उतरलेला आंदोलक शेतकरी नव्हता असा शोध लावून या मंडळींनी काय साध्य केले? जीन्स पॅण्टीत शेतकरी कधीपासून वावरू लागला? असा प्रश्न करून त्यांनी शेतकऱ्यांच्या नव्या पिढीची विटंबनाच केली. सुटाबुटातले लोक शेतकऱ्यांना सल्ले देऊ शकतात. ‘‘कर्जमाफी करणार नाही’’ असे सांगणाऱ्या अरुंधती भट्टाचार्य या काय नऊवारी साडी व नाकात नथ घालून स्टेट बँकेच्या खुर्चीवर बसल्या आहेत काय? असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. 
 
मोबाईलचे बिल भरायला पैसे आहेत, पण विजेचे बिल भरायला शेतकरी टाळाटाळ करतो अशी मुक्ताफळे उधळणाऱ्यांना असेही विचारता येईल की, ‘‘बाबांनो, निवडणुका जिंकण्यासाठी व सत्ता खेचण्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च करता ना, मग कर्जमुक्तीसाठी का रडता?’’ शेतकरी रस्त्यावर उतरला म्हणून त्याच्याशी सूडाने वागाल तर याद राखा! असा सज्जड दमच उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

Web Title: What is a true farmer in the cabinet?, Uddhav Thackeray's hollow question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.