पाकिस्तानवर बळाचा वापर करायला मुहूर्त शोधावा काय? - उद्धव ठाकरे

By admin | Published: January 3, 2017 07:45 AM2017-01-03T07:45:38+5:302017-01-03T07:45:38+5:30

पठाणकोटपासून उरीपर्यंत पाकड्यांनी सांगून व ठरवून हल्ले केले व आपण बळाचा वापर कधी करावा यासाठी योग्य मुहूर्ताच्या शोधात असू, तर ते योग्य नाही असं उद्धव ठाकरे बोलले आहेत

What is the use of force in Pakistan? - Uddhav Thackeray | पाकिस्तानवर बळाचा वापर करायला मुहूर्त शोधावा काय? - उद्धव ठाकरे

पाकिस्तानवर बळाचा वापर करायला मुहूर्त शोधावा काय? - उद्धव ठाकरे

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - कोणत्याही युद्धाशिवाय आमच्या जवानांना बलिदान द्यावे लागत आहे. जवानांची बलिदाने थांबवून त्यांना सन्मान व प्रतिष्ठा देण्यासाठी नव्या लष्करप्रमुखांनी त्यांची कारकीर्द राबवली तर देश त्यांचा जास्त ऋणी राहील. बळाचा वापर करू हे त्यांचे विधान हास्यास्पद ठरू नये इतकेच. वेळ सांगून येत नसते हे बरोबर, पण पठाणकोटपासून उरीपर्यंत पाकड्यांनी सांगून व ठरवून हल्ले केले व आपण बळाचा वापर कधी करावा यासाठी योग्य मुहूर्ताच्या शोधात असू, तर ते योग्य नाही अशी खंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. 
 
देशाचे लष्करप्रमुख योग्य तेच बोलले व त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच, पण पाकड्यांना धडा शिकवण्याची ती योग्य वेळ नक्की कधी येणार? व त्याबाबत सरकार मुहूर्त वगैरे काढण्यात अडकले आहे काय? पाकिस्तानातही अलीकडेच नव्या लष्करप्रमुखांनी सूत्रे हाती घेतली आहेत व त्यांनीही आल्या आल्याच हिंदुस्थानला दम भरणारे फूत्कार सोडले हेसुद्धा लक्षात घेतले पाहिजे. पाकच्या नवीन लष्करप्रमुखांचेही म्हणणे असेच पडले की, हिंदुस्थानला वेळ येताच धडा शिकवू. हा धमक्या देण्याचा कार्यक्रम दोन्ही बाजूंनी साठ-पासष्ट वर्षांपासून सुरूच आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. 
 
आमचे लष्कर सदैव सज्ज आणि हिंमतवान आहेच. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते सीमेवर झुंज देत आहे. मात्र अनेक वर्षांपासून ते ‘खंदकां’त योग्य आदेशांची वाट पाहत बसले व खंदकात जळमटे वाढली आहेत हेदेखील तितकेच खरे आहे. तेव्हा आपल्या जवानांची हिंमत व ५६ इंचांची छाती आहेच. छातीवर गोळ्या झेलत दुश्मनांचा खात्मा करण्यासाठीही ते सज्ज आहेत, मात्र पाकिस्तानला धडा शिकविण्याची राजकीय इच्छाशक्ती दिल्लीतील राज्यकर्त्यांत आहे काय, हाच खरा प्रश्‍न आहे असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. 
 
वास्तविक, गेल्या अडीच वर्षांत कश्मीर खोर्‍यात सर्वाधिक जवान शहीद झाले आहेत. पाकिस्तानसारखा चिमूटभर देश अतिरेकी हिंदुस्थानात घुसवून वारंवार आपल्या जवानांचे हत्याकांड घडवीत असताना आपण गप्प का म्हणून राहायचे? आपल्याच जवानांचे मृतदेह आपण किती वेळा मोजत बसायचे? असुरक्षिततेची टांगती तलवार आणखी किती वर्षे सहन करायची? असे संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले आहेत.
 
मागच्या दीड-दोन वर्षांत तर पाकिस्तानने शेकडो वेळा युद्धबंदी मोडून हिंदुस्थानी लष्कराच्या चौक्यांवर हल्ले चढवले. सरहद्दीलगत असलेल्या गावांची परिस्थिती तर भयावह झाली आहे. पाकिस्तानी तोफगोळे कधीही घरादारांवर येऊन आदळतात. ग्रामस्थ जीव मुठीत धरून सुरक्षित ठिकाणी पळ काढतात. ही पळापळ एकदाची थांबलीच पाहिजे. मध्यंतरी पाकड्यांवर जो सर्जिकल स्ट्राइक की काय केला, हासुद्धा म्हणे बळाचाच वापर होता व त्यामुळे पाकड्यांचे दात पूर्णपणे घशात गेल्याचे सांगण्यात आले होते, पण त्या सर्जिकल स्ट्राइकनंतरही सीमेवर ७० पेक्षा अधिक जवानांना वीरमरण पत्करावे लागले असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 

Web Title: What is the use of force in Pakistan? - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.