सर्जिकल स्ट्राइकची सत्यता काय पडताळता?
By admin | Published: October 18, 2016 04:07 AM2016-10-18T04:07:55+5:302016-10-18T04:07:55+5:30
आपल्या देशातील राजकारण्यांना शहिदांच्या रक्ताची किंमत नाही.
बदलापूर : आपल्या देशातील राजकारण्यांना शहिदांच्या रक्ताची किंमत नाही. जर ती असती तर भारताने यशस्वीपणे केलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या सत्यतेचे पुरावे एकाही राजकारण्याने मागितले नसते. राजकारण्यांच्या घरातील कुणी युद्धासाठी रणमैदानात जात नाही. त्यामुळे त्यांना शहिदांच्या कुटुंबांचे दु:ख कळत नाही आणि सर्जिकल स्ट्राइकवर अविश्वास दाखवला जातो. या स्ट्राइकचे पुरावे कसले मागता, असा परखड सवाल वीरमाता अनुराधा गोरे यांनी केला.
भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून देशभरात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर बदलापुरात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, शारदा वाचनालय आणि युवाराज प्रतिष्ठानतर्फे ‘लेखक-वाचक भेट’ या कार्यक्र माचे आयोजन केले होते. या अंतर्गत लेखिका आणि वीरमाता अनुराधा गोरे वाचकांच्या भेटीला आल्या होत्या. ‘देशाचे संरक्षण आणि आपली जबाबदारी’ या विषयावर त्या बोलत होत्या.
देशातील विविध लढाया आणि त्यामागील राजकारणाबाबत गोरे यांनी संशोधनातून विपुल लेखन केले आहे. त्यावरूनच देशात झालेल्या लढाया, त्यातील यशापयशाची माहिती त्यांनी दिली. देशाच्या इतिहासात आजपर्यंत झालेल्या लढाया, त्यातील देश आणि आपला विजय यांची कारणे त्यांनी मांडली. देशात जेव्हाजेव्हा राजकारण्यांना हव्या तेव्हा लढाया झाल्या, त्यात्या वेळी भारताला मोठे नुकसान सोसावे लागले. त्यामुळे राजकारण्यांनी देशाच्या संरक्षणात एक तर ठाम भूमिका घ्याव्यात किंवा त्यांनी संरक्षण दलाला स्वायत्तता द्यावी, असे परखड मतही त्यांनी मांडले.
>पाकिस्तान आता घरातच
भारतातील राजकारण्यांनी आपला इतिहास लक्षात ठेवला नाही, म्हणून आज देशाचा भूगोल बदलला असून कराचीपर्यंत बेचिराख केलेला पाकिस्तान आता आपल्या घरात घुसत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. राजकीय निर्णयांमुळेच देशाचा नकाशा बदलला आहे, असे निरीक्षणही गोरे यांनी नोंदवले.
भारतरत्न डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त कॅप्टन आशिष दामले यांनी हा कार्यक्रम आयोजित केला.