मविआचं पहिल्या बैठकीत जागावाटपाबद्दल काय ठरलं? राऊतांनी दिली महत्त्वाची अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 11:07 AM2024-08-25T11:07:25+5:302024-08-25T11:14:39+5:30
Maharashtra Vidhan Sabha elections 2024: महाविकास आघाडीने विधानसभेच्या जागावाटपाची चर्चा सुरू केली आहे. यासंदर्भात पहिली बैठक २४ ऑगस्ट रोजी झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल संजय राऊतांनी माहिती दिली.
Maha Vikas Aghadi Vidhan Sabha Elections 2024: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीने जागावाटपावर लक्ष्य केंद्रित केल्याचे दिसत असून, पहिली बैठक मुंबईत पार पडली. मविआच्या पहिल्या बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा झाली आणि राज्यातील जागावाटपाबद्दल काय ठरले, याबद्दल संजय राऊतांनी महत्त्वाची माहिती दिली.
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. विधानसभा जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीचे काय ठरले, याबद्दलही संजय राऊतांनी यावेळी भाष्य केले.
मविआची कोणत्या जागांबद्दल झाली चर्चा?
खासदार राऊत म्हणाले, "महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही बाबतीत मतभेद नाहीत. आमची काल (२४ ऑगस्ट) जागावाटपासंदर्भात पहिली बैठक झाली. या बैठकीत मुंबईतील जागांबद्दल तिन्ही पक्षांनी चर्चा केली. सहमतीने जवळपास ९९ टक्के जागांवर आमचे एकमत झाले आहे."
"महाविकास आघाडीमध्ये ना मुख्यमंत्रिपदावरून मतभेद आहेत, ना इतर कोणत्या पदावरून. जागावाटपासंदर्भातही आमच्यात मतभेद नाहीत. सगळे काही व्यवस्थित होईल. महाविकास आघाडी सरकार बनवत आहे", असा दावा संजय राऊतांनी केला.
आमच्या सहकाऱ्यांबद्दल मी बोलणार नाही -राऊत
"आमचे सहकारी काय सांगताहेत, त्याबद्दल मी आता काहीच बोलणार नाही. कालच्या बैठकीला तिन्ही पक्षांचे प्रमुख उपस्थित होते. सुरळीत चर्चा झाली. मुंबई हा मोठा प्रदेश आहे. महाराष्ट्राची राजधानी आहे. इथे कायम शिवसेनेचे आणि मराठी माणसाचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक जागावाटप होईल", असे संजय राऊत यांनी सांगितले.
"मुंबई तोडण्याचे कारस्थान दिल्लीतून सुरू आहे. त्याला शह देण्यासाठी मुंबई आमच्या सगळ्यांच्या ताब्यात असणे गरजेचे आहे. त्यापद्धतीनेच हे जागावाटप आम्ही सगळे करतो आहोत. मविआ म्हणून ही लढाई होईल", असे खासदार राऊत म्हणाले.
राज्यातील जागावाटपावर चर्चा कधी?
याच मुद्द्यावर पुढे बोलताना राऊत यांनी सांगितले की, "संपूर्ण महाराष्ट्रात समतोल पद्धतीने जागावाटप होईल. ते बंद दाराआड होईल. त्यासंदर्भात कोणी बाहेर येऊन काही सांगणार नाही. मीही सांगणार नाही. मुंबईचा विषय संपत आलेला आहे. २७ ऑगस्टपासून उर्वरित महाराष्ट्राची चर्चा सुरू होईल", अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.