अमित शहा आणि उद्धव ठाकरेंमध्ये तेव्हा काय चर्चा झाली होती? CM एकनाथ शिंदे म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 08:14 PM2022-07-31T20:14:29+5:302022-07-31T20:14:38+5:30
'मी उद्धव ठाकरेंना म्हणालो होतो की, देवेंद्र फडणवीस आणि आपण समोर बसून चर्चा करू. प्रत्येक समस्येतून मार्ग काढता येतो, फक्त तो इच्छाशक्ती असावी लागते.'
सिल्लोड: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बडंखोरी केल्यापासून ठाकरे गटातील नेते त्यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. तसेच, शिंदे गटाकडूनही त्याला प्रत्युत्तर दिले जात आहे. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात आले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसेच, गेल्या काही काळात घडलेल्या सर्व घटनांवर भाष्य केले.
'जनतेने युतीला निवडून दिले होते'
सिल्लोडच्या जाहीर सभेत बोलताना शिंदे म्हणाले की, 'आम्ही शिवसेना आणि भाजपने युती म्हणून निवडणूक लढवली होती. एकीकडे बाळासाहेबांचा आणि दुसरीकडे नरेंद्र मोदींचा फोटो लावला होता. हिंदुत्वाचा एक विचार घेऊन पुढे गेलो होतो. त्यामुळेच जनतेने भाजपचे 106 आणि शिवसेनेचे 56 आमदार निवडून दिले. पण, नंतर काय झालं? काही लोकांची वक्तव्ये आली- आम्हाला अनेक दरवाजे मोकळे आहेत. ती कशाची सुरुवात होती?' असा प्रश्न शिंदेंनी उपस्थित केला.
तेव्हा काय चर्चा झाली?
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, 'निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेत काय बोलणी झाली होती, ती मला माहित नव्हती. पण, आता माझ्या भाजपच्या नेत्यांसोबत गाठीभेटी झाल्या, त्यात मला तेव्हाची बरीच माहिती मिळाली. अमित शहांनी मला सांगितले की, आमची कमीटमेंट फायनल असते. आम्ही तिकडे बिहारमध्ये कमी जागा आलेल्या नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले. तर, शिवसेनेचा मुख्यमंत्री करायला अडचण नव्हती. आम्ही उद्धव ठाकरेंना शब्द दिला असता, तर तो पाळला असता. पण, आमचे तसे काहीच बोलणे झाले नव्हते.'
'आघाडी करू नका असं आम्ही म्हणालो होतो'
ते पुढे म्हणाले की, 'मी साक्षीदार आहे, शिवसेना भाजप युती म्हणून आपण निवडून आलो होतो. मी तेव्हा उद्धव ठाकरेंना म्हणालो होतो की, देवेंद्र फडणवीस आणि आपण समोर बसून चर्चा करू. प्रत्येक समस्येतून मार्ग काढता येतो, फक्त तो शोधण्याची इच्छाशक्ती असावी लागते. पण, तसं झालं नाही. नंतर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू झाली. तेव्हा आम्ही सगळे म्हणालो होतो, ही अशी आघाडी करू नका. पण, पक्षाचा आदेश ऐकायचा असतो, बाळासाहेबांची शिकवण आहे. नंतर आघाडी सरकार स्थापन झालं,' अशी माहिती शिंदेंनी दिली.