मद्य कारखान्यांच्या पाण्याचे करायचे काय?
By admin | Published: May 5, 2016 01:34 AM2016-05-05T01:34:04+5:302016-05-05T01:34:04+5:30
जिल्ह्यातील मद्यनिर्मितीच्या कारखान्यांचे पाणी कपात करण्यात आले आहे़ मात्र, हे पाणी पिण्यायोग्य नाही़ त्यामुळे उपलब्ध झालेल्या १५ कोटी लीटर पाण्याचे करायचे काय?,
अहमदनगर : जिल्ह्यातील मद्यनिर्मितीच्या कारखान्यांचे पाणी कपात करण्यात आले आहे़ मात्र, हे पाणी पिण्यायोग्य नाही़ त्यामुळे उपलब्ध झालेल्या १५ कोटी लीटर पाण्याचे करायचे काय?, असा पेच प्रशासनासमोर निर्माण झाला आहे़
मद्यनिर्मितीच्या कारखान्यांचे ५० टक्के पाणी कपात करून हे पाणी पिण्यासाठी उपलब्ध करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला आहे. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत जिल्ह्यातील २६ कारखान्यांनी स्वत: हून पाणी पुरवठ्यात ५० टक्के कपात केली आहे़ तसा अहवाल त्यांनी बुधवारी दिला.
यानुसार २७ एप्रिल ते १० जून, या काळात १५ कोटी लीटर पाणी वाचणार आहे़ परंतु उपलब्ध होणारे पाणी पिण्यासाठी योग्य आहे की नाही, याची चाचपणी केली असता बहुतांश कारखान्यांचे पाणी पिण्यासाठी योग्य नाही, असे प्रशासनाचे प्राथमिक मत आहे. त्याचा पिण्यासाठी कसा वापर करता येईल, याचा अहवाल संबंधित तहसीलदारांकडून मागवला आहे़ त्यासाठी लागणारा खर्चही यंत्रणांना दिला जाणार आहे़ न्यायालयाचा आदेश असल्याने प्रशासन याबाबत अधिकृतपणे काही बोलत नाही.
एमआयडीसीचे पाणी पिण्यायोग्यच- नगरसह सुपा औद्योगिक वसाहतीतील इतर कारखान्यांचे २० टक्के पाणी कपात करण्यात आले असून, त्यामुळे २७ एप्रिल ते ९ मे या काळात १७ कोटी लीटर, तर १० जूनपर्यंत ५५ कोटी लीटर पाणी उपलब्ध होणार आहे़ हे सर्व पाणी पिण्यासाठी योग्य असून, ते टँकरद्वारे उपलब्ध करून देणे शक्य आहे़