कोरोना 'लॉकडाऊन' हटल्यानंतर नेमकी 'कशी' असणार महाराष्ट्रातल्या मंदिरांमधील दर्शन व्यवस्था?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 05:59 PM2020-08-04T17:59:37+5:302020-08-04T18:00:44+5:30
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व मंदिरे सध्या कुलुपबंद.
पुणे : महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे ही भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. दरवर्षी ही स्थळे लाखो भाविकांच्या गर्दीने गजबजलेली असतात. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन काळात
शासनाने मंदिरे बंद ठेवली आहेत. परंतु शासनाची परवानगी मिळाल्यानंतर मंदिरे उघडण्यापूर्वी, उघडल्यानंतर आणि कोविडचे संकट टळेपर्यंत कोणती खबरदारी घ्यायची यासंबंधी मंदिर व्यवस्थापनेच्या नवीन कार्यप्रणालीची मार्गदर्शक पुस्तिका तयार करण्यात आली आहे.
कोविड लॉकडाऊन नंतर मंदिर व्यवस्थापनेची नवीन कार्यप्रणाली कशी असायला हवी यासंबंधी चर्चा घडवून आणण्यासाठी पर्यावरण अभियंता प्रा. राजेंद्रकुमार सराफ आणि पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे विश्वस्त शिवाजीराव मोरे यांनी पुढाकार घेतला. या विषयावर जुलैमध्ये एक चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्राच्या अहवालावर एक कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील 22 मंदिर देवस्थानांनी सहभाग घेतला.त्यामध्ये श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर देवस्थानचे विश्वस्त डॉ प्रशांत सुरू, स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस चे विश्वस्त जयंत देसाई , श्री दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर चे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विश्राम देव, तुळजाभवानी मंदिर तुळजापूर चे नागेश शितोळे, धर्मराज कडाडी मुख्य विश्वस्त सिद्धेश्वर मंदिर सोलापूर, औंधच्या यमाई मंदिराचे विश्वस्त राजेंद्र गुरव, प्रतापराव गुरव, नंदकुमार ठोले, जैन मंदिर निगडी, रवींद्र गुरव सहभागी झाले होते. या कार्यशाळेत झालेल्या विचारमंथनातून मंदिर व्यवस्थापनेच्या नवीन कार्यप्रणालीची मार्गदर्शक पुस्तिका तयार करण्यात आली आहे.
या पुस्तिकेमध्ये मंदिराचे अर्थकारण, कोव्हिडं विषाणू व भक्ताची तपासणी, लॉक आऊट नंतर मंदिर उघडण्यासाठी माहितीचे संकलन, मंदिर उघडण्याची पूर्वतयारी, भक्तांसाठी आचारसंहिता, मंदिर प्रथम कसे उघडावे? आणि मंदिर आपत्ती व्यवस्थापन आदी प्रमुख बाबी समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
...........
महाराष्ट्रात योगा सेंटर वगैरे सारख्या काही गोष्टी सुरू करण्यात येत आहे. लवकरच धार्मिक स्थळ सुरू करण्यासाठी भाविकांचा दबाव वाढत जाईल. आपल्या दैवतांना अजून किती दिवस कुलुपात ठेवायचं? यावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे या उद्देशातून महाराष्ट्रातील सर्व प्रमुख मंदिरांच्या विश्वस्तांशी संपर्क साधण्यात आला. चर्चासत्र आणि कार्यशाळेतील सहभागी सर्व विश्वस्तांच्या सूचनांचा विचार करून कोविड लॉकडाऊन नंतर मंदिर व्यवस्थापनाच्या नवीन कार्यप्रणालीसाठी ही मार्गदर्शक पुस्तिका तयार तयार करण्यात आली आहे. शासनाची मंजुरी घेऊन महाराष्ट्रातील सर्व मंदिरांना ती पाठविली जाईल-
ह.भ.प शिवाजीराव मोरे, विश्वस्त, श्री विठठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर
.......
मार्गदर्शक पुस्तिकेमधील महत्वपूर्ण बाबी
* भक्तांच्या माहितीचे संकलन आणि तपासणी करणे
*खोकला, थंडी वाजणे, धाप लागणे, श्वास घेण्यास अडचण होणे, घसा खवखवणे, अंग दुखणे असे असल्यास भक्तांना मंदिरात प्रवेश नाकारणे.
* मंदिर परिसरात आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी सर्वेक्षण करणे.
* गर्भ गृहात प्रवेश वर्जित करण्यासाठी बॅरिकेट्स उभे करणे, भक्त, पुजारी आणि सेवेकरी यांमध्ये सुरक्षित अंतर असावे
*मंदिराचा कोणता परिसर भक्तांच्या संपर्कात येतो त्याचे निर्जंतुकीकरण करणे
* मंदिरात हवा खेळती असायला हवी
* तीर्थ व पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा वापर करणे.
* मंदिराच्या आतील आणि बाहेरील विक्रेत्यांची माहिती संकलित करणे
* भक्तांची मंदिरात येण्याची कारणे व त्यानुसार प्रतिदिनी येणाऱ्या भक्तांची संख्या यावर लक्ष्य ठेवणे
* रोज, शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी येणाऱ्या भक्तांची संख्या व त्याचे स्त्री, पुरूष, वृद्ध, मुले असे वर्गीकरण करणे
* कमीत कमी 25 स्थानिक आणि 25 परगावावरून येणाऱ्या भक्तांची माहिती संकलित करणे.
......