मदरसे, मशिदींवर शूर अधिकारी धाडी घालतील काय? - उद्धव ठाकरे
By admin | Published: December 30, 2016 07:51 AM2016-12-30T07:51:00+5:302016-12-30T08:06:14+5:30
परदेशातून येणा-या पैशांचा हिशेब मागण्यासाठी मदरसे, मशिदींवर आयकर विभागाचे शूर अधिकारी धाडी घालतील काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - परदेशातून येणार्या पैशांचा हिशेब मागण्यासाठी मदरसे, मशिदींवर आयकर विभागाचे शूर अधिकारी धाडी घालतील काय? पण तेवढी हिंमत या लोकांत नक्कीच नाही. शेवटी धाडी घालण्यासाठी सरकारला मंदिरांचे पुरोहितच सापडले अशी सडसडीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. काँग्रेस पक्षावर पांघरूण घालावे असा हा निधर्मीवाद आहे. काँग्रेस, मुलायमसिंह किंवा लालू यादवांचा निधर्मीवाद झक मारेल अशी कामगिरी पुरोहितांच्या जानव्यास हात घालून बजावण्यात आली. तेव्हा लोकहो, गर्व से कहो हम हिंदू हैं! मग अयोध्येत राम मंदिर झाले नाही तरी चालेल! असा टोलाही उद्धव ठाकरेंनी सामना संपादकीयमधून लगावला आहे.
पुरोहित मंडळींकडे बर्यापैकी पैसाअडका असावा असे म्हटले जाते; पण हा पैसा असून कितीसा असणार? आणि असला तरी तो काही मटका किंवा दारूची ठेकेदारी करून मिळविलेला नाही. दिवसभर उन्हात-पहाटेच्या थंडीत पौरोहित्य करून ही कष्टाची कमाई असायला हरकत नाही. यापैकी दोनेक पुरोहितांकडे प्रत्येकी ‘कोटी’भर रकमांचे घबाड सापडले व त्यामुळे समस्त पुरोहित वर्गास बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.
महाराष्ट्र ही साधूसंतांची, देवादिकांची भूमी आहे व शिर्डीपासून पंढरपूर, अष्टविनायकापर्यंत अशी अनेक धर्मस्थाने येथे आहेत. तेथे हजारो लोक पौरोहित्य करीत असतात. पंढरपूर, जेजुरी, शेगाव ही बहुजनांची तीर्थस्थाने आहेत. मग उद्या अशा सगळ्याच तीर्थक्षेत्रांवरील पुरोहितांवर धाडी घालून त्यांना आरोपी केले जाणार आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
एम.आय.एम.चे अध्यक्ष मियां ओवेसी यांनी या नोटाबंदीचा तडाखा मुसलमानांनाच बसत असल्याचे सांगितले. कारण काय तर म्हणे मुसलमानांच्या मोहोल्ल्यात ‘एटीएम’च्या मशीन नाहीत. त्यामुळे हाल हाल सुरू आहेत, पण मियां ओवेसी यांना आम्ही सांगू इच्छितो की, त्यांचे मुसलमान भाईबंद हे जास्त सुखी आहेत. कारण हिंदू वसाहतीत ज्या एटीएम मशीन आहेत त्यातून दिवसभर रांगा लावून पैसे मिळत नाहीत व त्या रिकाम्या पेटार्यांवर अपेक्षाभंगाचे डोके फोडून घ्यायची वेळ लोकांवर आली आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
दुसरे असे की, काळा पैसा हा फक्त मंदिरांतील पुरोहितांकडेच आहे असा शोध लावून मोदी सरकारने आपण पक्के निधर्मी असल्याचे जाहीर करून टाकले. हिंदुस्थानातील चर्चना मोठ्या प्रमाणात पैसा परदेशातून येतो व तो पैसा दलित, आदिवासी यांच्या धर्मांतरासाठी वापरला जातो. ही सर्व धर्मांतरे ‘ऑनलाइन’ म्हणजे ‘कॅशलेस’ स्वरूपात झाली असे आयकरवाल्यांना वाटते काय? अर्थात, जशा धाडी हिंदू पुरोहितांच्या घरादारांवर पडल्या, तशा धाडी ख्रिस्ती ‘पुरोहितां’च्या घरांवर टाकण्याचे धाडस कुणी दाखवले नाही असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
मुसलमानांच्या बाबतीत तरी वेगळे काय बोलावे! विशिष्ट मशिदींमधून धर्मांध शक्तींना मोठा अर्थपुरवठा होतच आहे. महाराष्ट्रापासून देशाच्या कानाकोपर्यात जे मदरसे व मशिदी उभ्या राहिल्या त्यांची भव्यता थक्क करणारी आहे व इस्लामी राष्ट्रातून त्यासाठी परदेशी चलन सुसाट येत आहे. या परदेशातून येणार्या पैशांचा हिशेब मागण्यासाठी मदरसे, मशिदींवर आयकर विभागाचे शूर अधिकारी धाडी घालतील काय? असा जाहीर सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.