डीएसके आज काय सांगणार ? याकडेच सर्वांचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 07:19 AM2017-11-21T07:19:55+5:302017-11-21T07:20:40+5:30
हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल झालेले व हायकोर्टाने हे पैसे कसे परत करणार यासाठी शेवटची मुदत दिलेल्या डी. एस. कुलकर्णी यांनी आज स्वतः पत्रकार परिषद बोलावली
पुणे : हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल झालेले व हायकोर्टाने हे पैसे कसे परत करणार यासाठी शेवटची मुदत दिलेल्या डी. एस. कुलकर्णी यांनी आज स्वतः पत्रकार परिषद बोलावली असून त्यात ते आपली अटक टाळण्यासाठी कोणती योजना जाहीर करतात ? गेले वर्षभर त्यांच्या विषयी उलट सुलट बातम्या आल्या तरी त्याविषयी त्यांनी कधीही त्याबाबत कोणताही खुलासा केला नाही, त्यामुळे आज ते काय सांगणार याकडे गुंतवणूकदार, फ्लॅटधारक यांच्यासह सर्वांचे लक्ष लागले आहे.
आतापर्यंत डीएसकेंवर पुणे, मुंबई आणि कोल्हापुर येथे गुंतवणुकदारांच्या हिताचे संरक्षण अधिनियमाखाली गुन्हे दाखल झाले आहेत.
सुमारे ३५०० एफडी धारकांनी आपल्या तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल केल्या आहेत. या गुंतवणूकदारांचे सुमारे २०० कोटी रुपये या प्रकरणात अडकले आहेत.
एफडी धारकांच्या गुन्ह्याबरोबरच डीएसके आणि त्यांच्या कंपन्यांच्या चार संचालकांवर कर्मचाऱ्यांचा निर्वाह भत्ता न भरता अपहार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत सुरेंद्र जयसिंह फाळके यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार डी. एस. कुलकर्णी यांच्यासह संचालक विजयकुमार नथू जगताप, सहिंद्र जगन्नाथ भावळे आणि शन्मुख सोमेश्वर दुर्वासुला यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी डीएसके यांच्या फसवणुकीची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन केले असून त्यांचा तपास जोरात सुरू आहे.
याशिवाय डीएसके यांच्या मालमत्तेवर आता बँकांनी ताबा घेण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे पैसे भरूनही ताबा न मिळाल्याने असंख्य फ्लॅटधारकानी फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. तसेच एकच फ्लॅट बँकांकडे गहाण असताना तो परस्पर विकल्या ची प्रकरणे पुढे येऊ लागली आहेत. त्यामुळे आज डीएसके नेमके काय सांगणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.