१५ वर्षात झाले नाही ते दोन महिन्यात काय होणार ?
By admin | Published: May 12, 2014 12:31 AM2014-05-12T00:31:55+5:302014-05-12T04:14:18+5:30
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या मंत्र्यांना जलद निर्णय घेण्याच्या व तयारीला लागण्याच्या दिलेल्या सूचनांची भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी खिल्ली उडवली़
शिर्डी : लोकसभा निवडणुकीत झालेली दमछाक व येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या मंत्र्यांना जलद निर्णय घेण्याच्या व तयारीला लागण्याच्या दिलेल्या सूचनांची भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी खिल्ली उडवली़ पवारांना हे उशिरा सुचलेले शहाणपण असून त्यांनी गेल्या पंधरा वर्षांत अशा कानपिचक्या आपल्या मंत्र्यांना दिल्या असत्या तर राज्याचा विकास झाला असता. आता जे पंधरा वर्षात झाले नाही ते दोन महिन्यात काय होणार, असा उपरोधिक टोलाही मुंडे यांनी लगावला. पक्ष व पंतप्रधान देतील ती जबाबदारी स्वीकारू, आपल्याला कोणतीही राजकीय महत्वाकांक्षा नाही, केवळ देशात व राज्यात काँग्रेस हद्दपार करणे एवढीच आपली इच्छा होती, असे सांगतानाच गरज पडल्यास महाराष्ट्रात परतण्याचे संकेतही मुंडे यांनी दिले़ भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी रविवारी सपत्नीक साईदरबारी हजेरी लावली़ यावेळी रविकाका बोरावके, सचिन तांबे, प्रकाश चित्ते, गजानन शेर्वेकर, रवी गोंदकर, स्वाधीन गाडेकर, बद्री वाकचौरे, अशोक पवार आदींची उपस्थिती होती़ साईदर्शनानंतर मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ राज्यात महायुतीला ३२-३५ जागा मिळतील व केंद्रात स्पष्ट बहुमत मिळेल,असा दावाही त्यांनी यावेळी केला़ विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावरुन महायुतीत कोणताही वाद होणार नाही, असा दावा करत मुंडे यांनी मनसेच्या महायुतीतील प्रवेशाची शक्यता खोडून काढली़ राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल व भाजपाच्या संबंधाचा इन्कार करत राष्ट्रवादीला एनडीए मध्ये स्थान नसेल असेही त्यांनी स्पष्ट केले़ सक्षम नेतृत्व व मुद्दे नसलेल्या काँगे्रसचे जहाज या निवडणुकीत भरकटले, त्यांना पंतप्रधान पदाचा उमेदवारही जाहीर करता आला नाही़ विकासाचे मुद्दे हरवलेल्या काँग्रेसने केवळ मोदींना टार्गेट केले़ पराभवानंतर सोनिया गांधी, राहुल व प्रियंका यांनी निवांतपणे नेतृत्वाबाबत विचार करावा, नेहमी यशाचे श्रेय घेणार्या गांधी घराण्याने पराभवाचीही जबाबदारी स्वीकारायला हवी, असे मत मुंडे यांनी व्यक्त केले़ यंदाच्या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन या नेत्यांची उणीव जाणवली़ मात्र दुसर्या फळीतील आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी ती दूर करण्याचा प्रयत्न केला़ काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख व आपण जवळचे मित्र होतो पण एकमेकांना राजकीय मदत करत नव्हतो, असे सांगून या निवडणुकीत आपल्याला त्यांची उणीव जाणवल्याचा मुंडे यांनी इन्कार केला़ काँग्रेसला मात्र त्यांची उणीव जाणवल्याचे मुंडे यांनी सांगितले़ (वार्ताहर)