वाराणशीत ‘आप’का क्या होगा?
By admin | Published: May 11, 2014 12:37 AM2014-05-11T00:37:42+5:302014-05-11T00:37:42+5:30
साधनसामुग्री नाही आणि महत्वाचे म्हणजे जाती धर्माच्या नावावर मिळणारा हक्काचा मतदार नाही. अशा वेळी केजरीवाल निवडून येतील तरी कसे ? हा प्रश्न आहे.
Next
>गजानन जानभोर - वाराणशी
परिश्रम, प्रामाणिक कार्यकर्त्यांची सोबत, सामान्यांतून सामान्य माणसापर्यंत पोहचण्याचे प्रयत्न, मतदारांच्या थेट हृदयात हात घालणारा संवाद एवढय़ा जमेच्या बाजू असुनही अरविंद केजरीवाल वाराणशीच्या रणांगणात बाजी मारतीलच, याची शाश्वती देता येत नाही. कारण, फारसा निधी नाही, संघटित कार्यकर्त्यांची फळी नाही, साधनसामुग्री नाही आणि महत्वाचे म्हणजे जाती धर्माच्या नावावर मिळणारा हक्काचा मतदार नाही. अशा वेळी केजरीवाल निवडून येतील तरी कसे ? हा प्रश्न आहे.
नरेंद्र मोदी यांनाच निवडून द्यायचे या निष्कर्षाप्रत वाराणशीची जनता येऊन पोहोचली आहे, असा दावा भाजपा करत आहे. सुरुवातीला मोदींपुढे अडथळ्यांचे अनेक घाट होते. पण हळुहळू ते पूर्ण करण्यात मोदींना यश आले. वाराणशीची हवा आता त्यांच्यासाठी अनुकूल झाली आहे, असे मोदी सर्मथकांचे म्हणणे आहे. अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणशीच्या लढाईत उतरून ही निवडणूक देशभरात चर्चेला आणली. केजरीवाल मोदींच्या विरोधात येथून उभे राहिले नसते तर या निवडणुकीची एवढी चर्चाही झाली नसती ही वस्तुस्थिती आहे.
नेत्यांच्या सभांना, रोड शो ला उसळणार्या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये होत नाही. हा निवडणुकांमधील सार्वत्रिक अनुभव आहे. केजरीवालांच्या सभांना, रोड शो ला लोक गर्दी करतात. त्यात उत्सुकता असते, शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्याची भावनाही असते. ‘यावेळी आपल्याला बदल हवा आहे, असे सार्यांना सांगणारा सामान्य माणूस आपली बांधिलकी सिद्ध करण्यासाठी, स्वत:च्या मनाला बजावून सांगण्यासाठी केजरीवालांच्या नुक्कड सभेला उपस्थिती लावतो, पांढरी टोपी घालून फिरण्यात त्याला कमालीचा आनंदही मिळतो. ‘मी प्रामाणिक आहे आणि चांगल्या माणसाच्या पाठीशी उभा आहे’ हे त्याला सुचवायचे असते. आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी पाच वर्षांतून एकदाच मिळणारी संधी तो सोडणार तरी कसा? पण मतदान करताना त्याची जात आणि धर्म आड येतो. आपले मत वाया तर जाणार नाही ना? असा नफ्या-तोट्याचा व्यवहार त्यात असतो. लाटेचा, अस्मितेचा, नातेसंबंधांचा त्याच्यावर एवढा दबाव असतो की, मतदान करताना तो व्यवहारच बघतो. केजरीवालांच्या बाबतीत वाराणशीत नेमके हेच होत आहे.
या निवडणुकीत वाराणशीत ‘छतसभा’ हा एक आगळावेगळा प्रयोग पाहायला मिळाला. दाटीवाटीच्या मोहल्ल्यात नुक्कड सभाही घेता येत नाही. अशा ठिकाणी केजरीवालांच्या कार्यकर्त्यांनी घरावरच्या छतांवर सभा घेतल्या. हे काँग्रेस आणि भाजपवाल्यांनाही जमले नाही. वाराणशीच्या मुख्य रस्त्यांवर आणि चौकात हातात झाडू घेतलेले तरुण तासनतास उभे असल्याचे दिसतात. ते कुणाशी बोलत नाहीत. भाषणही देत नाहीत. ते फक्त शांत उभे असतात. रस्त्याने जाणार्या येणार्यांचे लक्ष गेले की, झाडूकडे लक्ष वेधून नमस्कार करतात. दरवेळी धार्मिक, जातीय अस्मितेभोवतीच गुरफटणार्या वाराणशीकरांना यावेळी प्रथमच त्यांच्या प्रश्नांची, समस्यांची जाणीव करून देण्यात आली. याचे श्रेय कुणाला आवडो न आवडो पण ते केजरीवालांनाच द्यावे लागेल. वाराणशीचे दुखणे, गार्हाणे प्रथमच या निमित्ताने सार्या जगासमोर आले.
वाराणशीचा एक वेगळा स्वभाव आहे. ती आपला स्वभाव कधीच बदलत नाही. ‘परिवर्तन’ हवे पण ‘क्रांती’ नको, असे या स्वभावाचे वर्णन करता येईल. मोदींच्या रुपाने ते परिवर्तन होईल, पण केजरीवालांच्या रुपाने क्रांती करायला ही नगरी धजावणार नाही.
केजरीवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी त्यांना मिळालेला पाठिंबा आणि शुक्रवारच्या रोड शोमध्ये उसळलेला जनसमुदाय बघितल्यानंतर केजरीवाल शंभर टक्के निवडून यायला हवेत. पण तसे होणार नाही. याचे कारण असे की, वाराणशीच्या मतदारांनी कौल कुणाला द्यायचा हे ठरवून टाकले आहे. प्रेम, सहानुभूती केजरीवालांबद्दल परंतु मत मोदींनाच असा हा वाराणशीकरांचा हिशेब आहे.