नारायण राणे आम्हाला काय शिकवणार ? ते तर भाजपचे बकरे : गुलाबराव पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 02:31 PM2020-03-07T14:31:52+5:302020-03-07T14:32:10+5:30
पाटील यांनी महाविकास आघाडीचं सरकार पडणार असं म्हणणाऱ्या नेत्यांवर कडाडून टीका केली.
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत दाखल झाले आहेत. उद्धव यांच्या दौऱ्यात महाविकास आघाडीतील मंत्री आणि काँग्रेसनेते सुनील केदार देखील आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत सर्वकाही सुरळीत असल्याचा संदेश गेला आहे. याला अनुसरूनच शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले की, याआधी उद्धव ठाकरे अयोध्येला आले होते. त्यावेळी त्यांनी 'पहले मंदीर, फिर सरकार' असा नारा दिला होता. आता राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. शिवसेनेने हिंदुत्व सोडले नसल्याचे संकेत देण्यासाठी हा अयोध्या दौरा का, असा प्रश्न पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, हिंदुत्वाचा ठेका कोणी घेतला ? शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला हिंदुत्व शिकवलं आहे.
यावेळी पाटील यांनी महाविकास आघाडीचं सरकार पडणार असं म्हणणाऱ्या नेत्यांवर कडाडून टीका केली. नारायण राणे म्हणाले होते, गणपती बुडण्याआधी शिवसेनेला बुडवीन. सरकार अकरा दिवसही नाही टीकणार. परंतु, नारायण राणे आम्हाला काय शिकवणार ? तेच भाजपचे बकरे बनल्याची खोचक टीका त्यांनी केली. तसेच महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.