वय निघून गेल्यावर नोकरी देणार काय?

By Admin | Published: December 19, 2014 12:48 AM2014-12-19T00:48:30+5:302014-12-19T00:48:30+5:30

गेल्या १५ वर्षांपासून आम्हाला अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी टाळाटाळ केली जाते. रिक्त पदे असताना, त्यातच कंत्राटी तत्त्वावर कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जात असताना आम्हाला सेवेत घेतले जात नाही.

What will you do if you leave the job? | वय निघून गेल्यावर नोकरी देणार काय?

वय निघून गेल्यावर नोकरी देणार काय?

googlenewsNext

अनुकंपाधारकांचा सवाल : आत्मदहनाचा इशारा; जीवन प्राधिकरणची नोकरीसाठी टाळाटाळ
गणेश खवसे - नागपूर
गेल्या १५ वर्षांपासून आम्हाला अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी टाळाटाळ केली जाते. रिक्त पदे असताना, त्यातच कंत्राटी तत्त्वावर कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जात असताना आम्हाला सेवेत घेतले जात नाही. १५ वर्षांपासून शासनाचे उंबरठे झिजवत आहे. मात्र पदरी निराशा आली. नोकरीसाठी ४० वर्षे वयाची अट आहे. शासनाचे उंबरठे झिजवत असताना आमचे वयसुद्धा वाढत आहे. या अधिवेशनात आम्हाला नोकरीत घेण्याची मागणी पूर्ण झाली तर ठीक अन्यथा आम्ही इथेच आत्मदहन करू, असा इशारा अनुकंपाधारकांनी दिला आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अनुकंपाधारक कृती समितीच्या वतीने हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पटवर्धन मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. ‘आमच्या समस्या न सोडविल्यास पर्यायाने आम्हाला आत्मदहन करावे लागेल’ असा इशारा या अनुकंपाधारकांनी दिला. शासकीय सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास किंवा स्वेच्छानिवृत्ती यामुळे त्यांच्या जागेवर त्यांच्या वारसाला नोकरीत घेण्यात यावे, असा नियम आहे. अशा वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात येते. अशाप्रकारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये सध्या २५० हून अधिक अनुकंपाधारक आहेत. मात्र गेल्या १५ वर्षांपासून या अनुकंपाधारकांची यादी तयार करून नोकरीत घेतले जात नाही. वयाच्या ४० वर्षांपर्यंत नोकरीत सामावून घेतले जाते. परंतु यातील बहुतांश अनुकंपाधारक हे आता ४० वर्षाच्या आसपास आहेत. काहींसाठी हे शेवटचे वर्ष आहे, काहींना दोन - तीन वर्ष शिल्लक आहे. गेल्या १५ वर्षांपासून लढा उभारूनही मागणी मान्य होत नसल्याने हे अनुकंपाधारक पुरते हताश झाले आहे. परिणामी ते आता आत्मदहनाच्या तयारीत आहेत.
जीवन प्राधिकरणमध्ये गट क आणि गट ड ची एकूण २४४४ पदे रिक्त आहे. त्यातच जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने १८, धुळेने ८, औरंगाबादने ४२, अकोलाने १५, अहमदनगरने ४, सांगलीत ९ तर सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने ४ पदे अशा एकूण २२ जिल्हाधिकारी कार्यालयाने अनुकंपा तत्त्वावर पदे भरली. उर्वरित जिल्हाधिकारी कार्यालयात मात्र अनुकंपा तत्त्वावर पदभरती थांबलेली आहे. २२ आॅगस्ट २००५ च्या शासन निर्णयानुसार प्रतीक्षायादीतील अनुकंपाधारक उमेदवारांपैकी ५० टक्के उमदेवारांना पहिल्या वर्षी नोकरीत घेण्यात यावे, २५ टक्के उमेदवारांना त्यापुढील वर्षी तर उर्वरित २५ टक्के उमेदवारांनी तिसऱ्या वर्षी नोकरीत सामावून घेण्यात यावे असा आदेश देण्यात आला. मात्र या आदेशाची अवहेलना होत आहे.
अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यास टाळाटाळ करणारे जीवन प्राधिकरण आमच्याकडे अतिरिक्त कर्मचारी आहे, असे सांगते. तर दुसरीकडे सहायक अभियंत्यासाठी लोकसेवा आयोगामार्फत पदभरती करते, हे न उलगडणारे कोडे आहे. त्यातच अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जीवन प्राधिकरणाकडील अनुकंपाधारकांची यादी तयार करून सेवेत घेण्याचे आदेश दिल्यानंतर आम्हाला शासनाचा नियम लागू नाही, अशा आशयाचे पत्र दिले जाते. जीवन प्राधिकरणने वेळोवेळी शासनाची दिशाभूल करीत आम्हाला नोकरीत घेण्याचे टाळले. नोकरीत सामावून घेण्याची आमची मागणी असून ती मान्य न झाल्यास आम्ही आत्मदहन करू, असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी यावेळी दिला. धरणे आंदोलनात संघटनेचे सतीश सांगळे, किशोर लाहे, सुनील भेरे, धनंजय विशे, योगेश घरत, संदीप पेंढारकर, पुष्पराज एपुरे, सागर राऊत, विशाल साबळे, अमोल बोरकर, प्रमोद जोशी, सुनील वैद्य, किशोर केळवदे, कैलास मोहरकर, विशाल पोहेकर, मनोज धनविज, कलावती कुंभारे, दीपक धर्मे, सत्यजित मानेकर, सचिन घोडेराव, अनिल गजभार, गीतेश जोशी, रूपेश वाघमारे, सागर राऊत, अमोल देशमुख, पंकज गहाण, सतीश कुंभारे, संदीप लोणारे, अजय शहाणे आदी सहभागी झाले आहेत.
वडिलांच्या मृत्यूनंतर आईच्या आजारावर खर्च
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये काम करणाऱ्या गीतेश जोशी याच्या वडिलांचा मृत्यू २००९ मध्ये झाला. त्यानंतर ग्रॅज्युईटी, पीएफची रक्कम मिळाली. वडिलांच्या मृत्यूनंतर आईने अंथरुण पकडले. तिच्या आजारावर ते सर्व पैसे खर्च झाले. आईचासुद्धा मृत्यू झाला. घरी आम्ही दोघेच बहीण - भाऊ, दुसरा कोणता कामधंदासुद्धा नाही. नोकरी लागण्याचे स्वप्न उराशी बाळगून इतर सहकाऱ्यांसोबत शासनाचे उंबरठे झिजवत आहे. मात्र प्रयत्न फळाला आले नाही. माझ्यासारखी स्थिती इतरही अनुकंपाधारक उमेदवारांची आहे. ‘आम्ही अनाथ झालो; किमान शासनाने तरी आम्हाला आधार द्यावा’ अशी आर्त विणवणी गीतेशसह इतर अनुकंपाधारकांनी केली आहे.

Web Title: What will you do if you leave the job?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.