तुमच्या भांडणाशी मुंबईचा काय संबंध?
By admin | Published: February 15, 2017 03:52 AM2017-02-15T03:52:33+5:302017-02-15T03:52:33+5:30
मुंबई महापालिका निवडणुकीतील आपल्या पहिल्याच प्रचारसभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीतील आपल्या पहिल्याच प्रचारसभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले. २५ वर्षे महापालिकेत यांनी एकत्र भ्रष्टाचार केला. आता कोंबड्यांसारखे झुंजत आहेत. यांच्या भांडणाशी मुंबईचा काय संबंध, असा सवाल राज यांनी केला.
विक्रोळी येथील सभेने राज यांनी आपल्या प्रचार मोहिमेला सुरुवात केली. नव्या वर्षात नवा भारत दिसेल, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी केली. मात्र, दोनशे जणांचा बळी घेणाऱ्या नोटाबंदीने काय साधले याचे उत्तर दिले जात नाही. खोट्या नोटा येतच आहेत. कॅशलेसचाही काही पत्ता नाही. निवडणुकीच्या मोसमात फक्त भाजपाकडे पैसा आहे. पार्टी विथ डिफरन्स म्हणजे आमच्याकडे पैसा, तुमच्याकडे नाही, असाच प्रकार सुरू आहे.
सगळीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे होर्डिंग दिसत आहेत. कल्याण-डोंबिवलीसाठी सहा हजार कोटी देण्याची घोषणा त्यांनी पूर्वी केली होती. अजून साडेसहा रुपयेसुद्धा दिले नाहीत. शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांनी मुंबईतील मोकळ्या जागांवर स्वत:चे क्लब उघडले. सामान्यांसाठी काय केले, असा सवाल राज यांनी केला. २५ वर्षे पालिकेत सेना-भाजपा एकत्र आहेत. आता अचानक भाजपाला शिवसेनेचा भ्रष्टाचार दिसू लागला आहे. २५ वर्षे एकत्र होतात तेव्हा तुमच्या हाती काही लागले नाही का, इतकी वर्षे भ्रष्टाचाराला तुम्ही हातभार लावलाच ना, असा सवाल राज यांनी या वेळी केला. भाजपाला फक्त निवडणुका जिंकायच्या आहेत. १९५२ साली स्थापन झालेल्या भाजपाला आजही दुसऱ्या पक्षातून उमेदवार फोडावे लागतात, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
शिवसेना-भाजपाच्या कारभारावर टीका करताना नाशिकमध्ये अवघ्या पाच वर्षांत विकासकामे केल्याचा दावा राज यांनी केला. पाच वर्षांत डम्पिंग ग्राउंडचा खत प्रकल्प केला. टाटांच्या सहकार्यातून बोटॅनिकल गार्डन उभारले. आजपर्यंत त्याला ५० हजार लोकांनी भेट दिली. स्वत: रतन टाटांनी त्या कामाचे कौतुक केले, असे राज म्हणाले. (प्रतिनिधी)
परिस्थिती जैसे थे
केवळ ३७ हजार कोटींचे बजेट मांडले जाते, काम केले जात नाही. नवीन रस्ते बांधल्यानंतर त्यावरील खड्डे बुजविण्याचे कंत्राट काढणारे मुंबई एकमेव शहर आहे. रस्ते, आरोग्य आणि शिक्षणावर कोट्यवधींचा खर्च होतो. मात्र परिस्थिती जैसे थे आहे, अशी टीका राज यांनी केली.
पुढील चाळीस वर्षांसाठी नाशिकच्या पाण्याच्या प्रन सुटेल अशी पाइपलाइन योजना टाकली. खड्डे नसलेले रस्ते उभारले. टाटांच्या सहकार्यातून बोटॅनिकल गार्डन उभारले. आजपर्यंत त्याला ५० हजार लोकांनी भेट दिली. स्वत: रतन टाटांनी त्या कामाचे कौतुक केले, असे राज म्हणाले.