Jitendra Awhad : ठाण्यात जे काही झालं, ते महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभणारं नाही - जितेंद्र आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 11:29 AM2024-08-11T11:29:53+5:302024-08-11T11:42:01+5:30
Jitendra Awhad : ठाण्यात गडकरी रंगायतन येथे जमलेल्या आक्रमक मनसैनिकांनी ठाकरे यांच्या गाडीवर बांगड्याही फेकल्या. त्यामुळे रंगायतन परिसरात मनसैनिक आणि शिवसैनिक आमने-सामने आले. यावेळी त्यांनी परस्परांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली.
Jitendra Awhad : ठाणे : बीडमध्ये उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्याचे पडसाद शनिवारी ठाण्यात उमटले. उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे ठाण्यातील सभेसाठी येत असताना मुलुंड चेक नाक्याजवळ ठाकरे यांच्या गाडीवर मनसैनिकांनी शेण फेकले. त्यानंतर ठाण्यात गडकरी रंगायतन येथे जमलेल्या आक्रमक मनसैनिकांनी ठाकरे यांच्या गाडीवर बांगड्याही फेकल्या. त्यामुळे रंगायतन परिसरात मनसैनिक आणि शिवसैनिक आमने-सामने आले. यावेळी त्यांनी परस्परांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली.
दोन्हीकडील कार्यकर्त्यांना रोखताना पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात घेतल्याने पुढील राडा टळला. यावर ठाण्यात जे काही झाले ते महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभणारे नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केले आहे. यात जितेंद्र आव्हाड यांनी तीन व्हिडीओही शेअर केले आहेत.
ठाण्याचे पोलीस सध्या काय मानसिकतेत आहेत, हे या तीन व्हिडीओतून स्पष्ट होईल. मी अजिबात पोलिसांना दोष देत नाही. पण, अधिकाऱ्यांनी तरी कणा असल्यासारखे वागावे. अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या कणाहीन हालचाली पाहता पोलिसांच्या मनोबलाचे खच्चीकरण होत आहे. आपला अधिकारीच एवढा झुकत आहे तर, आपण का ताठ व्हावे, अशीच मानसिकता पोलीस दलाची झाली आहे. पण, अशाने महाराष्ट्राची मान खाली जात आहे. ज्या पोलीस खात्याचे सबंध जगभर कौतुक केले जायचे; त्यांच्यावर आता नामुष्की ओढावत आहे, हे कोणाच्याच लक्षात येत नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले, जे काही झाले ते महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभणारे नाही. विरोधी पक्षातील नेत्याचा जीव जर इतका धोक्यात असेल तर महाराष्ट्रात किती अराजकता माजली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. तुम्ही (राज ठाकरे) काहीही बोललात; कोणाची टिंगलटवाळी केली तर सगळ्यांनी ऐकून घ्यायचे; पण तुम्हाला कोणी काय बोलले की, तुम्ही गाड्या फोडणार, सभा उधळून लावण्याची धमकी देणार, माझ्याशी गाठ आहे, अशी भाषा वापरणार, असे सुनावतानाच, त्यांनी फक्त एवढेच लक्षात ठेवावे की, सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच जन्माला आलेले नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले ट्विटद्वारे म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंच्या गाडी वर झालेला प्राणघातक हल्ला
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 10, 2024
खालील तीन व्हिडिओज् मधून आपल्याला स्पष्ट होईल की, ठाण्याचे पोलीस सध्या काय मानसिकतेत आहेत. मी अजिबात पोलिसांना दोष देत नाही. पण, अधिकाऱ्यांनी तरी कणा असल्यासारखे वागावे. अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या कणाहीन हालचाली पाहता पोलिसांच्या… pic.twitter.com/o0WOzUkwwR
असा झाला राडा...
उद्धव ठाकरे यांच्या मोटारींच्या ताफ्याने ठाण्यात प्रवेश करताच मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्या गाडीवर शेण आणि बांगड्या फेकल्या. त्यानंतर त्यांची गाडी गडकरी रंगायतन येथे येताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी गडकरी रंगायतनच्या आवारात प्रवेश केला आणि घोषणाबाजी केली.
मोटारीवर बांगड्या फेकल्या. काहींनी हातातील लोखंडी कडे फेकले. गाडीवर नारळही फेकण्याचा प्रयत्न झाला. सुदैवाने त्यामुळे कुणाला इजा झाली नाही. उद्धव यांच्या स्वागताकरिता लावलेले बॅनर व पोस्टर मनसैनिकांनी फाडले. सभेकरिता आलेल्या वाहनांच्या मनसैनिकांनी काचा फोडल्या. ठाकरेंच्या सभेकरिता जमलेले शिवसैनिक बाहेरील घटना कळताच रंगायतनच्या बाहेर आले.
मनसैनिक व शिवसैनिक यांच्यात बाचाबाची, शिवीगाळ सुरू झाली. मात्र, सुरक्षेकरिता असलेल्या पोलिसांनी हातात मनसेचे झेंडे घेतलेल्या व घोषणाबाजी करणाऱ्यांना झटपट पकडून पोलिसांच्या गाड्यांत कोंबल्याने आणखी टोकाचा राडा टळला. त्यानंतर पोलिस बंदोबस्तामध्ये ठाकरे सभास्थळी दाखल झाले.