जे जे अनैतिक आहे, ते काम संजय राऊत करतात; चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 12:06 PM2022-05-26T12:06:11+5:302022-05-26T12:06:34+5:30
संजय राऊतांकडे पुरावे असतील तर त्यांनी कोर्टात जावं. त्यांना कोर्टात जाण्यापासून कुणी रोखलं आहे असा आरोप भाजपाने केला.
मुंबई – कालचक्र नेहमी फिरत असते. कोण कोणाला म्हसनात पाठवेल हे कळेल. जनता सगळ्यांना उत्तर देईल अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या टीकेचा समाचार घेतला आहे. राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिले तर लढवणार आणि जिंकणारही असंही त्यांनी सांगितले आहे. त्याचसोबत संजय राऊतांवर चंद्रकांत पाटलांनी(BJP Chandrakant Patil) निशाणा साधला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, जवळजवळ ज्या कारवाया झाल्यात त्या कोर्टात सिद्ध झाल्या. परंतु कोर्टावरही त्यांचा अविश्वास आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यावरील आरोप कोर्टाने नाकारले नाहीत. जे आरोपपत्र दाखल झाले त्यावर कोर्टाने सहमती दर्शवली. संजय राऊतांचे काम केवळ तपास यंत्रणावर संशय निर्माण करण्याचं आहे. जे जे अनैतिक आहे म्हणजे शरद पवारांच्या सांगण्यावरून शिवसेना-भाजपात तेढ निर्माण करण्याचं काम राऊतांचे आहे. २०१४ पासून गेल्या ८ वर्षापासून हेच सुरू आहे असा आरोप त्यांनी राऊतांवर केला.
तसेच भाजपा नेत्यांवर आरोप असतील तर न्यायालय आहे. अनिल देशमुखांबाबत जयश्री पाटील कोर्टात गेल्या. कोर्टाने गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर गुन्हा दाखल झाला. संजय राऊतांकडे पुरावे असतील तर त्यांनी कोर्टात जावं. त्यांना कोर्टात जाण्यापासून कुणी रोखलं आहे. राऊतांना कोर्टात जाता येत नसेल असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. त्याचसोबत तपास संस्थांवर प्रश्नचिन्ह उभं करणं, भारतीय संविधानाने यंत्रणा बनवल्या आहेत. संविधानाच्या चौकटीत या तपास यंत्रणा काम करतात. त्यावर आरोप करणं योग्य नाही. भाजपा कधीही यंत्रणांवर अविश्वास दाखवत नाही असंही त्यांनी स्पष्ट केले.
प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रकांतदादा पाटील यांचा पत्रकारांशी संवाद. https://t.co/q8eXiGFZWq
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) May 26, 2022
सदानंद सुळेंनी ग्रामीण भागात फिरावं
सदानंद सुळे यांनी ग्रामीण भागात राहायला शिका. आई पोराला म्हसनात जा म्हणते अशी म्हण आहे. सुप्रिया सुळेंचा अनादर करण्याचा प्रश्न नाही. भाजपा कधीही महिलांचा अपमान करत नाही. तुमच्या पत्नीचा असो वा कुठल्याही महिलेचा अनादर करण्याचा माझा स्वभाव नाही असं उत्तर चंद्रकांत पाटील यांनी सदानंद सुळेंना दिले आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
ज्याप्रकारे अनिल परब यांच्यावर कारवाई होतेय त्याहून गंभीर गुन्हे भाजपा नेत्यांवर आहेत. मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही. सूडाच्या भावनेने कितीही कारवाया केल्या तरी आम्ही गप्प बसणार नाही. सरकार सुरळीत चालेल. महाराष्ट्राच्या राजकारणाला इतके वाईट वळण गेल्या ५५ वर्षात मिळालं नव्हतं. शिवसेनेचं मनोबल आणि मविआ सरकारचं मनोबल खच्चीकरण होत नाही. भाजपा नेत्यांविरोधात आमच्याकडे सक्षम पुरावे आहेत. नवलानीला कुणी पळवले त्याचे उत्तर द्यावे असं संजय राऊतांनी सांगितले.