तुमच्या आंदोलनाला जो काही राजकीय वास येतोय...; दरेकरांचे जरांगे पाटलांना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 12:42 PM2024-07-21T12:42:19+5:302024-07-21T12:42:38+5:30
जरांगे खालच्या पातळीवरील भाषा वापरत आहेत. त्यांनी राजकारण करू नये अशीच आमची मागणी आहे, असे दरेकर म्हणाले.
भुजबळ बाजुला पडले आणि मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील व भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चांगलीच जुंपली आहे. आज दरेकरांनी जरांगेंना पुन्हा एकदा निशाण्यावर घेत उद्धव ठाकरेंवरही टीका केली आहे.
उद्धव ठाकरे यांची ओबीसीतून आरक्षण द्यायची तयारी आहे का असे त्यांना जरांगे यांनी विचारावे. तुमचे देवेंद्र फडणवीस, महायुती सरकार हेच लक्ष्य आहे की मराठ्यांचा प्रश्न हे लक्ष्य आहे, असाही सवाल दरेकर यांनी केला. जरांगे खालच्या पातळीवरील भाषा वापरत आहेत. त्यांनी राजकारण करू नये अशीच आमची मागणी आहे, असे दरेकर म्हणाले.
तुम्ही अंतरवालीत छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसणार आणि प्लानिंग कसले करणार की कोणत्या मतदारसंघात जायचे, कोणाला पाडायचे आणि कोणाला निवडून आणणार. म्हणजे तुम्ही पूर्णत: राजकीय झाला आहात. मग राजकीय तरी भूमिका घ्या, अशी टीका दरेकर यांनी जरांगे यांच्या आंदोलनावर केली.
मराठा तरुण, तरुणींचे अश्रू आम्ही नेहमीच पुसत असतो. मराठा समाजाला राजकारणात ओढू नका. सरकारकडे आम्ही तुमचे दूत म्हणून काम करण्यास तयार आहोत. परंतू, तुमच्या आंदोलनाला जो काही राजकीय वास आता यायला लागलाय तसे असेल तर खुली राजकीय भूमिका घ्या, असे आव्हान दरेकर यांनी जरांगे यांना दिले आहे. तसेच मराठा समाजाच्या भावनांचा राजकारणासाठी उपयोग करूनन घेऊ नका, असे म्हटले आहे.