जे काही केलं ते मुख्यमत्र्यांच्या सहीनं - छगन भुजबळ
By admin | Published: February 9, 2016 04:40 PM2016-02-09T16:40:16+5:302016-02-10T12:05:52+5:30
महाराष्ट्र सदनसह सर्व संबंधित निर्णय सगळ्या खात्यांच्या संमतीनं वमुख्यमंत्र्यांच्या सहीनं झाल्याची बाजू छगन भुजबळ यांनी मांडली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - आमच्यावरील सर्व आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे आहेत, महाराष्ट्र सदन बांधकामात कुठेही भ्रष्टाचार झालेला नाही असं सांगताना महाराष्ट्र सदनसह सर्व संबंधित निर्णय सगळ्या खात्यांच्या संमतीनं व मुख्यमंत्र्यांच्या सहीनं झाल्याची बाजू छगन भुजबळ यांनी मांडली आहे. तसेच, आतापर्यंतच्या चौकशीला पूर्णपणे सहकार्य केलं आहे असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आपल्यावर असलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी आज राष्ट्रवादी भवनमध्ये पत्रकार परिषेद घेउन त्यांच्यावरील आरोपाचं खंडन केले. समीरची चौकशी करायला काही हरकत नाही, पण अटक करायची काय गरज होती असं विचारत ही कारवाई सुडबुद्धीनं होत असल्याचं भुजबळ म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक आणि आनंद परांजपे उपस्थित होते.
तेलगी प्रकरणी चार्जशीटवरही छगन भुजबळ हे नाव कुठेच नाही. तेव्हा आम्हाला पोलिटिकली टार्गेट केलं गेलं. आत्ताही तोच प्रकार होतोय.
— NCP (@NCPspeaks) February 9, 2016
- छगन भुजबळ
पत्रकार परिषदेत भुजबळांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे -
- १ तारखेपासून बऱ्याच घडामोडी सुरु आहेत, मी वॉशिंग्टनला गेल्यानंतर भुजबळ पळून गेल्याची चर्चा सुरु झाली
कामाच्या फाईल अनेक विभागांनी तपासल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याला मंजुरी दिली, एक नव्या पैशाचाही घोटाळा झाला नाही
मी आतापर्यंतच्या चौकशीला पूर्णपणे सहकार्य केलंय, मी पळून जाण्याचा प्रश्नच नव्हता, मी अमेरिकेत होतो, इथं माझ्याबाबत अफवा पसरवल्या गेल्या. अमेरिका दौरा पुर्वनियोजित होता, शरद पवारांना माझ्या दौऱ्याची कल्पना होती.
- अनियमितता कुठेही झाली नाही असा अधिकाऱ्यांनी अहवाल दिला असताना परत चौकशी का? स्वत:हून कोणतेही निर्णय घेतलेले नाहीत, सर्व निर्णय सामुहिक असून कुठेही भ्रष्टाचार झालेला नाही.
- आपण कोणतीही चूक केलेली नसून कोणत्याही कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगत शरद पवारांचा आशिर्वाद आपल्या पाठिशी आहोत.
- कालिना असो व खारघर येथील मालमत्ता असो, या काही आमच्या मालमत्ता नाहीत, त्यात अनेक भागीदार आहेत. या सगळ्या आमच्या मालमत्ता आहेत हे म्हणणं चुकीचं.
- सगळ्या महत्त्वाच्या खात्यांच्या सचिवांनी व्यवहार बघितले, सह्या केल्या, निविदा काढल्या, मुख्यमंत्र्यांच्या सहीनं मंजुरी देण्यात आली. असं असताना माझ्यावर ठपका का?
- जर का घोटाळा वाटत असेल तर त्यासाठी संपूर्ण निर्णयप्रक्रिया बघायला हवी आणि त्यानुसार विचार व्हायला हवा.
- इतर भूखंडांबाबत जे काही बोललं जातं, ते व्यावसायिक निर्णय आहेत. त्यात अनेक भागीदार आहेत. झोपडपट्टी पुनवर्सन सारख्या योजना आहेत. जे काही आहे ते पारदर्शी आहे आणि सगळे व्यावसायिक करतात त्याप्रमाणेच योग्य आहे.
- समीरनं जे काही केलं ते नियमांना धरून केलं आणि सगळ्या प्रकारच्या चौकशीला आम्ही सामोरे जात आहोत.
- भ्रष्टाचारविरोधी पथकानं हिच चौकशी केली, त्यांना अटक करावीशी वाटली नाही, मग ईडीनंच का अटक केली.
- १५ वर्षांचे व्यवहार व हिशोब मागितल्यावर ते द्यायला वेळ लागणारच, त्याला असहकार्य म्हणत नाहीत. समीरनं स्वत: फोन करून चौकशीला गेला.
दरम्यान, बेहिशेबी मालमत्ता आणि महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी अडचणीत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे अखेर आज दुपारी अमेरिकेतून मुंबई विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी समर्थकांनी विमानतळावर मोठ्या प्रमाणात हजेरी लाऊन घोषणाबाजी करत शक्तीप्रदर्शन केले. यावेळी भुजबळ यांनी सर्व कार्यकर्त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानत त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले
गेल्या आठवड्यात भुजबळ यांच्या मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाकडून छापे मारण्यात आले होते. एक डझनपेक्षा जास्त अधिका-यांनी छगन भुजबळ तसेच पंकज व समीर भुजबळ यांच्या विविध ठिकाणच्या नऊ मालमत्तांवर छापे मारले.
छगन भुजबळ लवकरच तुम्हाला तुरुंगात दिसतील अशी प्रतिक्रिया भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी या छाप्यांवर दिली आहे. छगन भुजबळ तसेच पंकज व समीर भुजबळ यांच्या विविध ठिकाणच्या नऊ मालमत्तांवर छापे मारण्यात आले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भुजबळ यांच्या मालकीचा बांद्रे येथील एक मोकळा भूखंड व सांताक्रूझ येथील एक नऊ मजली इमारत या दोन्ही मालमत्तांवर टाच आणली होती.
तर याचप्रकरणी भुजबळ यांचा पुतण्या माजी खासदार समीर भुजबळ यांना इडीने गेल्या आठवड्यात अटक करून त्यांचा पासपोर्टही जप्त केला.