‘नो एन्ट्री’मध्ये वॉच कुणाचा?

By admin | Published: July 23, 2016 01:27 AM2016-07-23T01:27:56+5:302016-07-23T01:27:56+5:30

२५ ते ३० किलोमीटरचे रस्ते असे असतानाही गेल्या काही वर्षांत पुणेकर वाहतूककोंडीच्या विळख्यात सापडले आहेत.

What's the 'no entry' watch? | ‘नो एन्ट्री’मध्ये वॉच कुणाचा?

‘नो एन्ट्री’मध्ये वॉच कुणाचा?

Next


पुणे : तब्बल ३१ लाख वाहने... या वाहनांच्या वर्दळीसाठी तब्बल २१०० किलोमीटरचे अर्धवट रुंदीकरण झालेले रस्ते... तर नव्याने दरवर्षी तयार होणारे २५ ते ३० किलोमीटरचे रस्ते असे असतानाही गेल्या काही वर्षांत पुणेकर वाहतूककोंडीच्या विळख्यात सापडले आहेत.
त्यामुळे या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागातील काही प्रमुख रस्त्यांवर काही ठिकाणी नो एन्ट्री करण्यात आलेली असून काही ठिकाणी चारचाकी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करीत दररोज शेकडो वाहनचालक वेळ वाचविण्यासाठी नियम धाब्यावर बसवून वाहतूककोंडीस जबाबदार ठरत असताना पोलिसांकडून मात्र त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र ‘लोकमत’ने शहरात केलेल्या पाहणीत दिसून आले.
पावतीवरच होते पोलिसांचे समाधान
शहरातील रस्ते नो एन्ट्री करण्यामागे वाहतूककोंडी कमी करणे हा मुख्य उद्देश होता. तो सफल व्हावा, म्हणून पोलिसांकडून दंडही आकारला जातो. मात्र, चूक केली तर पोलीस काय करणार आणि पोलीस आज असतील उद्या नाही. अशी भूमिका घेऊन नियम धाब्यावर बसविले जात आहेत. त्यामुळे ज्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिसांनी एकदा फाडलेली दंडाची पावती दिवसभर चालते. त्यामुळे कितीही वेळा ये-जा करू शकतो, अशी भूमिका घेऊन नियम मोडले जात आहेत.
>फलक फक्त नावालाच..
महापालिकेकडून नव्या पुलावर तसेच नदीपात्रातील रस्त्यावरून शनिवारवाड्याकडे जाताना अमृतेश्वर मंदिराच्यासमोर रस्ता अतिशय लहान आहे. त्यातच हा रस्ता बाजीराव रस्त्याला मिळत असल्याने या ठिकाणी संपूर्ण दिवसभर वाहतूककोंडी होते. ही कोंडी एवढी प्रचंड असते, की त्याचा ताण थेट बाजीराव रस्त्यावर येऊन शिवाजी पूल, तसेच अप्पा बळवंत चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे या रस्त्यावर चारचाकी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
ही बंदी घातल्यानंतर फलक दिसत नसल्याचे कारण वाहनचालक पुढे करतात. त्यामुळे नागरिकांना दिसतील अशा स्वरूपात भलेमोठे फलकही लावण्यात आलेले आहेत. मात्र, त्यानंतरही सकाळ-संध्याकाळ या ठिकाणी चारचाकी वाहनांची गर्दी असते आणि वाहतूककोंडीही जशीच्या तशीच दिसून येते.
>वाकडेवाडी भुयारी मार्ग
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिवाजीनगरमधून महामार्ग तसेच संगमवाडी कडे जाणाऱ्या दुचाकी वाहनांसाठी वाकडेवाडी येथे भुयारी मार्ग उभारण्यात आला आहे. या मार्गातून केवळ दुचाकींना जाण्यास परवानगी आहे. तसेच फलकही ज्या ठिकाणी दुचाकी वाहने भुयारी मार्गात प्रवेश करतानाच चारचाकी वाहनांना बंदी असल्याचे नजरेला सहज दिसतील, असे फलक लावण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतरही या मार्गात चारचाकी वाहनांचीच चलती आहे. अनेकदा या ठिकाणी वाहतूककोंडी झाल्यानंतर साखर संकुलच्यासमोर वाहतूक पोलीस भुयारी मार्गाच्या बाहेर असतात. मात्र, तेसुद्धा या गाड्यांना जाण्यासाठी रस्ता करून देताना दिसतात, तर अनेकदा मालवाहक गाड्याही या मार्गात घुसतात व अडकून पडतात.
नागनाथपार ते
खजिना विहीर
सदाशिव पेठ, शुक्रवार पेठ, नारायण पेठ या मध्यवर्ती पेठांना, तसेच शहराची मध्यवर्ती बाजारपेठेला जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे. या रस्त्यांची रुंदी लहान आहे. त्यातच रस्त्याच्या एका बाजूला पार्किंग आहे. त्यामुळे दोन चारचाकी वाहने अथवा बाजारपेठेचे साहित्य घेऊन आलेली मालवाहतूक वाहने समोरासमोर आल्यास वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. त्यामुळे नागनाथपारकडून खजिना विहिरीकडे जाताना हा रस्ता एकेरी करण्यात आला. मात्र, हा नियम धुडकावत अनेक वाहने उलट्या दिशेने जातात, तर अनेकदा प्रवासी वाहनेही या मार्गातून जातात. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांमध्येच या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.
>भिडे पूल
डेक्कनवरून शहराच्या मध्यवर्ती भागाला जोडणारा तसेच कर्वे रस्त्यावरील दुचाकी वाहनांना शहरात नदीपात्रातून येण्यासाठी हा सर्वाधिक उपयुक्त रस्ता आहे. त्यामुळे या पुलावर सकाळी पाय ठेवायला जागा मिळणार नाही एवढ्या दुचाकींची वर्दळ असते. त्यामुळे या पुलावर सकाळी आणि रात्री चारचाकींना बंदी घातलेली आहे, तर अनेकदा या ठिकाणी वाहतूक पोलीसही उभे असतात. मात्र, त्यांना झुगारून अनेक चारचाकी वाहनांची या पुलावरून राजरोसपणे वर्दळ सुरूच असते. तर पोलिसांना पकडताच हे वाहनचालक त्यांनाही न जुमानता त्यांच्याशीच हुज्जत घालतात. बंदी आहे तर पोलीस पूल सुरू होण्याच्या ठिकाणीच का थांबत नाहीत, असा प्रतिवाद करीत सर्वच वाहतूक अडवून धरताना दिसून येते.

Web Title: What's the 'no entry' watch?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.