श्रीमंत मजूर होण्यात गैर काय ?; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 09:00 AM2022-03-24T09:00:39+5:302022-03-24T09:00:56+5:30
कामगारांचे प्रश्न सभागृहात मांडण्याचे आश्वासन
नवी मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे नेते श्रीमंत मजूर म्हणून माझ्यावर टीका करतात. पण मजुरांनी श्रीमंत व्हायचेच नाही का. माथाडी कामगारांनीही श्रीमंत व्हायचे नाही का, असा प्रश्न विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बुधवारी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्तांवर ईडीने कारवाई केल्याविषयी विचारणा केली असता याविषयी ईडीचे अधिकारीच माहिती देतील, असे स्पष्ट केले.
राज्यातील माथाडी कामगार संघटनांमध्ये गुन्हेगारीचा शिरकाव होत आहे. या गुंडगिरीविरोधात आवाज उठविला जाईल. पुण्यामधील मुकादमाच्या हत्येची पाळेमुळे शोधून काढण्यासाठीही पाठपुरावा करणार आहे. कामगारांच्या प्रश्नांवर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये आवाज उठविला जाईल, असे आश्वासन दरेकर यांनी दिले.
माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त नवी मुंबईमधील माथाडी भवनमध्ये आयोजित मेळाव्यात दरेकर यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. माथाडी कामगारांचे प्रश्न हे सरकार सोडविणार नसेल तर विधानसभा व विधानपरिषदेमध्ये ताकदीने आवाज उठविला जाईल. गुंडगिरी मोडीत काढण्यासाठीही पाठपुरावा करु असे ते म्हणाले.
खुनाचे धागेदोरे मुंबई, नवी मुंबईपर्यंत
पुण्यात माथाडी मुकादम ज्ञानोबा मुजुमुले यांचा १७ मार्चला खून झाला. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. खुनाचे धागेदोरे मुंबई, नवी मुंबईपर्यंत आहेत. या खुनामागील सूत्रधारांना अटक झाली पाहिजे, अशी मागणी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केली. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
माजी मंत्री गणेश नाईक, शशिकांत शिंदे, माजी आमदार नरेंद्र पाटील यांनीही यावेळी कामगारांच्या प्रश्नांवर लक्ष वेधले. माथाडी चळवळ टिकविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत, असे आवाहनही करण्यात आले.