गहू, हरभरा काढणीला आला अन् अवकाळीने दणका दिला, नाशिक, बुलढाण्यात सर्वाधिक नासाडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 08:55 IST2025-04-05T08:55:06+5:302025-04-05T08:55:32+5:30
Unseasonal Rains: गेल्या आठवड्यापासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे १७ जिल्ह्यांमधील सुमारे १३ हजार हेक्टरहून अधिक शेती पिकांचे नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या गहू, हरभरा पिकाला मोठा फटका बसला असून भाजीपाला तसेच फळपिकांनाही या अवकाळीने चांगलाच दणका दिला आहे.

गहू, हरभरा काढणीला आला अन् अवकाळीने दणका दिला, नाशिक, बुलढाण्यात सर्वाधिक नासाडी
पुणे - गेल्या आठवड्यापासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे १७ जिल्ह्यांमधील सुमारे १३ हजार हेक्टरहून अधिक शेती पिकांचे नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या गहू, हरभरा पिकाला मोठा फटका बसला असून भाजीपाला तसेच फळपिकांनाही या अवकाळीने चांगलाच दणका दिला आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली असून त्याचा अंतिम अहवाल लवकरच सादर केला जाईल, असे कृषी विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे. सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यातील सुमारे पावणेसहा हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे झाले आहे.
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. परिणामी, बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कृषी विभागाने तयार केलेल्या प्राथमिक अहवालानुसार १७ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र तसेच कोकणातील जिल्ह्यांचा समावेश आहे.
ज्वारी, मका, बाजरीसह केळी, द्राक्ष, डाळिंब बागांमध्ये फळगळती
एकूण १३ हजार १९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून त्यात गहू व हरभरा या रब्बी पिकांचा समावेश आहे. ज्वारी, मका बाजरी तसेच भाजीपाला पिके व केळी, द्राक्ष, आंबा, डाळिंब, पपई, संत्रा व चारापिकांचेही नुकसान झाले आहे.
सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात झाले असून येथील सहा तालुक्यांमध्ये ५ हजार ७९५ हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्या खालोखाल बुलढाणा जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये ५ हजार ४२ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांचे पंचनामे करण्यास महसूल व कृषी विभागाने सुरुवात केली आहे.
२६ हजार हेक्टरवर नासाडी, विम्याबाबत निर्णय घेऊ: कृषिमंत्री
राज्यातील अनेक भागांत दोन दिवसांत अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसला असून, पंचनाम्याचे आदेश संबंधित कृषी विभागाला देण्यात आले आहेत. २४ जिल्ह्यांतील ११० तालुक्यांमध्ये २६ ते २७ हजार एकरांवरील पिके जमीनदोस्त झाली आहेत. पुढच्या चार-पाच दिवसांत आपत्ती व्यवस्थापन विभागासोबत बैठक घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी येथे माध्यमांशी बोलताना दिली. पीक विम्याचे पुनर्गठन करण्यात येत असून, सरकार लवकरच याबाबत धोरणात्मक निर्णय घेईल, असेही कोकाटे म्हणाले. दोन दिवसांत ११० तालुक्यांत पावसाने कहर केला. आपत्ती व्यवस्थापन विभागाशी माझी आजच भरपाईबाबत काय करता येईल, याविषयीची चर्चा झाली असून, यात जिरायती पिकांचेही नुकसान झाल्याची माहिती कोकाटे यांनी दिली. पीक विम्यासाठी अर्ज करता येत नाही? या प्रश्नावर कोकाटे यांनी ही बाब शासनास मान्य असून, लवकरच अंतिम निर्णय होणार असल्याचे सांगितले. नाशिक जिल्ह्यात कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले.
कर्जमाफीवरून बोट दुसरीकडेच
राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा गाजत असून, याबाबत कृषिमंत्री कोकाटे यांना प्रश्न विचारला असता मी कृषिमंत्री असलो तरी याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री व दाेघे उपमुख्यमंत्रीच घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.