ब्रिटीशकालीन भाटघर धरणाचे ४५ स्वयंचलित दरवाजे उघडतात तेव्हा...
By Admin | Published: August 9, 2016 08:47 PM2016-08-09T20:47:18+5:302016-08-09T20:47:18+5:30
तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरणाचे पाणी खाली सोडण्यासाठी बसविलेल्या स्वयंचलित दरवाजांची चाचणी (ट्रायल) घेण्यासाठी ४५ दरवाजांमधून मंगळवारी २० हजार ४३० क्युसेक्सने
>ऑनलाइन लोकमत
भोर, दि. 09 - तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरणाचे पाणी खाली सोडण्यासाठी बसविलेल्या स्वयंचलित दरवाजांची चाचणी (ट्रायल) घेण्यासाठी ४५ दरवाजांमधून मंगळवारी २० हजार ४३० क्युसेक्सने १० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले. चाचणी यशस्वी झाल्यावर अर्ध्या तासात पाणी पुन्हा बंद करण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव व उपअभियंता विजय नलावडे यांनी सांगितले.
भाटघर धरण भागात आज १६ मिमी, तर एकूण ७५७ मिमी पाऊस होऊन धरण ९७ टक्के भरले आहे. २३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणावरील ४५ स्वयंचलित दरवाजांची चाचणी घेण्यासाठी धरणावर कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांच्या हस्ते नारळ फोडून पाणीपूजन करून सायंकाळी ४.१५ वाजता भोंगा वाजवून सर्वांना सतर्क करण्यात आले. त्यानंतर ४ वाजून १७ मिनिटांनी धरणाचा पहिला गेट सुरू करण्यात आला. ४.३० वाजता शेवटचा ४५ वा गेट सुरू होऊन धरणातील प्रत्येक दरवाजातून ४५४ क्युसेक्सने पाणी बाहेर पडत होते. अशा एकूण ४५ दरवाजांतून २०४३० क्युसेक्सने १० दशलक्ष घनफूट पाणी बाहेर पडले.
हे स्वयंचलित दरवाजे ४५ नंबरच्या दरवाजाकडून सुरू झाले आणि १२ मिनिटांत एक नंबरच्या दरवाजापर्यंत गेले. गेटवॉल बंद केल्यावर एक नंबरच्या दरवाजाकडून १२ मिनिटांत ४५ नंबरच्या दरवाजापर्यंत येऊन बंद झाले. ३० मिनिटांत आॅटोमॅटिक (स्वयंचलित) दरवाजे सुरू झाले आणी बंदही झाले.
भाटघर धरणाला ४५ स्वयंचलित आणि ३६ रोलिंगचे असे एकूण ८१ दरवाजे असून यातून प्रतिसेकंदाला ५६ हजार ७०० वेगाने एकावेळी पाणी बाहेर पडते. भाटघर धरण गतवेळी ७० टक्केच भरले होते. मात्र या वेळी एक महिना अगोदरच ९७ टक्के भरले असून दोन-तीन दिवसांत १०० टक्के भरेल, असे शाखा अभियंता सदाशिव देवडे यांनी सांगितले.