सोनिया दुहनबाबत विचारताच जितेंद्र आव्हाडांनी जोडले हात, म्हणाले, "त्या काय…’’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 06:37 PM2024-05-28T18:37:53+5:302024-05-28T18:38:32+5:30
Sonia Duhan News: शरद पवार गटाच्या दिल्लीतील फारयब्रँड नेत्या सोनिया दुहन ह्या पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना सोनिया दुहन यांच्याबाबत विचारले असता त्यांनी हात जोडले आणि सोनिया दुहन ह्या काय पक्षाच्या इंदिरा गांधी आहेत का असा प्रतिप्रश्न केला.
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचं मतदान आटोपल्यापासून राज्यात वेगवेगळ्या राजकीय उलथापालथी होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पुन्हा एकदा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच पक्षाच्या दिल्लीतील फारयब्रँड नेत्या सोनिया दुहन ह्या पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना सोनिया दुहन यांच्याबाबत विचारले असता त्यांनी हात जोडले आणि सोनिया दुहन ह्या काय पक्षाच्या इंदिरा गांधी आहेत का असा प्रतिप्रश्न केला.
यासंदर्भातील वृत्त टीव्ही ९ मराठीने दिलं आहे. शरद पवार गटातील घडामोडी आणि सोनिया दुहन यांच्याबाबत जितेंद्र आव्हाड यांना विचारले असता आव्हाड यांनी हात जोडले आणि सोनिया दुहन ह्या काय पक्षाच्या इंदिरा गांधी आहेत का, असं विचारत एका वाक्यात विषय संपवला.
दरम्यान, शरद पवार गट सोडणार अशी चर्चा सुरू असलेल्या सोनिया दुहन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनातील नाराजी व्यक्त केली. सुप्रिया सुळे आणि त्यांच्या आसपासच्या लोकांमुळे शरद पवारांवर निष्ठा असणारे अनेक लोक आज पक्ष सोडून जातायेत. त्याचे उत्तर सुप्रिया सुळेंना द्यावे लागेल. अनेकदा शरद पवारांकडे आम्ही आमचं म्हणणं मांडलं, परंतु शेवटी ती मुलगी आणि बाहेरचे, असे सोनिया दुहन म्हणाल्या. मी अजून पक्ष सोडला नाही. अन्य कुठल्याही पक्षात प्रवेश केला नाही. मी कालच्या बैठकीला होते, मग असं पाहायला गेले तर जेव्हा पक्षात फूट पडली, आमदारांच्या बैठकीवेळी सुप्रिया सुळेही तिथे होत्या. मग त्यांनी अजित पवारांचा पक्ष जॉईन केला का? त्यामुळे मी अजून पक्षप्रवेश केला नाही. शरद पवारांना आणि राष्ट्रवादीला सोडलं नाही. परंतु काही गोष्टी मला सर्वांसमोर आणायच्या आहे, असेही त्यांनी सांगितले.