जिल्हाधिकारी वाहनचालक बनतात तेव्हा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2016 06:36 PM2016-11-04T18:36:17+5:302016-11-04T18:36:17+5:30
संपूर्ण जिल्ह्याचे प्रशासन सांभाळणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना वाहनचालक बनलेले तुम्ही कधी पाहिले आहे का. पण अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या वाहचालकाचा गाडीचे सारथ्य करत वेगळा आदर्श घालून दिला आहे.
>ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 4 - संपूर्ण जिल्ह्याचे प्रशासन सांभाळणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना वाहनचालक बनलेले तुम्ही कधी पाहिले आहे का. पण अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या वाहचालकाचा गाडीचे सारथ्य करत वेगळा आदर्श घालून दिला आहे. 31 वर्षे जिल्हाधिकाऱ्यांचे वाहनचालक म्हणून सेवा बजावून निवृत्त होत असलेल्या अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील वाहनचालक दिगंबर ठक (मामा) यांच्या गाडीचे सारथ्य करत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी वेगळा आदर्श घालून दिला.
अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील वाहन चालक दिगंबर ठक महसूल विभागात 31 वर्ष सेवा बजावून 31 ऑक्टोबरला सेवा निवृत्त झाले. त्यांना काल अकोल्याचे जिल्हाधिकारी जी . श्रीकांत यानी अभूतपूर्व असा निरोप दिला , ज्या ड्रायव्हरच्या सीटवर बसून दिगंबर मामा गेली 31 वर्ष आपली सेवा बजावत होते आणि त्यांच्या मागच्या सीटवर जिल्हाधिकारी बसत होते. आज चक्क जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यानी ड्रायव्हरची सीट घेतली आणि दिगंबर मामा जिल्हाधिकारी बसतात त्या सीटवर बसले. त्यापूर्वी जिल्हाधिका-यांच्या निवासस्थानी सोनम श्रीकांत यानी त्यांचा उचित गौरव केलेला होताच. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवास्थानापासून जिल्हाधिकारी कार्यालय हा साधारण एक ते दीड किलोमीटरचा रस्ता ड्रायव्हिंग करत दिगांबर मामांना जिल्हाधिकारी कार्यालयात आणले.
दिगंबर मामा भावविभोर झाले होते ...डोळे आनंदाने डबडबलेले होते. 31 वर्षाच्या सेवेचे सार्थक झाल्याचा भाव मनात तरंगत असल्याचे भाव चेहऱ्यावर जाणवत होते. एवढे होवूनही हा सोहळा संपला नव्हता. जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क आपल्या शेजारच्या व्हीआयपी चेअरवर बसवून दिगंबर मामांचा अख्ख्या महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या साक्षीने सपत्निक सत्कार केला. लाल दिव्याची चांदीची कार भेट दिली. ब्रिटीश काळापासूनच्या या कचेरीने अनेकानेक जिल्हाधिकारी पाहिले. अनेक सेवानिवृत्तीचे गौरव पाहिले पण सोहळा या सम हाच....!!